गोठणे दोनिवडे तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी संतोष कुडकर यांची बिनविरोध निवड
राजापूर प्रतिनिधी
तालुक्यातील गोठणेदोनिवडे गावच्या महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदी नेरकेवाडी येथील सामाजिक कार्यकर्ते संतोष कुडकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ग्रामसभेत एकमताने झालेल्या या निवडीबद्दल कुडकर यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
गोठणेदोनिवडे ग्रामपंचायतीची ग्रामसभा शनिवारी, २२ ऑगस्ट रोजी पार पडली. या ग्रामसभेत महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीच्या अध्यक्षपदासाठी संतोष कुडकर यांच्या नावावर एकमत झाले. त्यानंतर त्यांची बिनविरोध निवड जाहीर करण्यात आली. यावेळी सरपंच मुकेश विचारे तसेच मावळते तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष प्रकाश भोसले यांनी कुडकर यांचे अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी सरपंच मुकेश विचारे, उपसरपंच सुप्रिया हातणकर, ग्रामविकास अधिकारी दिपाली वडर, ग्रामपंचायत सदस्य दिलीप पवार, दर्शना लोळगे, पुनाजी पाजवे, नेरकेवाडीचे पोलीस पाटील सचिन मांडवकर, पोलीस पाटील श्रेया हातणकर, दिपक हातणकर, माजी सरपंच प्रभाकर हातणकर, संतोष निकम, शांताराम हातणकर, लुकाजी राघव यांच्यासह गोठणेदोनिवडे गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
संतोष कुडकर हे गेल्या काही वर्षांपासून सामाजिक तसेच शैक्षणिक क्षेत्रात सक्रियपणे कार्यरत आहेत. गोठणेदोनिवडे ग्रामपंचायतीचे सदस्य म्हणूनही त्यांनी जबाबदारी पार पाडली आहे. सामाजिक कार्यातील त्यांचा अनुभव आणि गावाशी असलेला सातत्यपूर्ण संपर्क लक्षात घेता तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे.
निवडीनंतर उपस्थित ग्रामस्थांनी संतोष कुडकर यांचे अभिनंदन करून त्यांना शुभेच्छा दिल्या