शिवीगाळ केल्याच्या रागातून पोमेंडी बुद्रुक येथे दगडाने मारहाण
रत्नागिरी
तालुक्यातील पोमेंडी बुद्रुक येथे शिवीगाळ का करतोस असे विचारुन दगड डोक्यात मारुन दुखापत करणाऱ्या संशयितांविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर सुरेश पवार (वय ३२, रा. पोमेंडी बुद्रुक, रत्नागिरी) असे संशयिताचे नाव आहे. ही घटना बुधवारी (ता. २९) दुपारी सव्वा दोनच्या सुमारास पोमेंडी बुद्रुक येथील मंगेश कदम यांच्या घराजवळ घडली.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार फिर्यादी रिक्षा चालक किशोर लुकाजी पवार (वय ४७, पोमेंडी बुद्रुक बौद्धवाडी, रत्नागिरी) हे बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास घरातून रत्नागिरी येथे जाण्यासाठी बस स्टॉप येथे चालत जात होते. ते मंगेश कदम यांच्या घराजवळ आले असता त्यांच्या वाडीतील विनोद बाबू पवार हे त्यांना भेटले. त्यांच्याशी फिर्यादी बोलत असताना संशयित सागर पवार हा गुरे घेऊन येत होता. तो वळणावर पुढे गेल्यानंतर फिर्यादी यांना विचारले की तु माझ्या बापाला शिविगाळी का करतोस. असे बोलून हातातील दगड फिर्यादी यांच्या डोक्याला डावे बासूस कानावर फेकून मारला. त्यावेळी फिर्यादी हे जमिनीवर खाली पडले त्यानंतर पुन्हा संशयिताने हातातील दगड पुन्हा फिर्यादी त्यांच्या डोक्यात मारुन दुखापत केली. या प्रकरणी किशोर पवार यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयिताविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.