मेडिकल सेल्समनची २.५४ लाखांची ऑनलाईन फसवणूक
क्रेडिट कार्डवरून पाच व्यवहारांत २.५० लाख, तर बचत खात्यातून यूपीआयद्वारे ४,२०० रुपये लंपास
रत्नागिरी
शहरातील अभ्युदयनगर, नाचणे रोड येथे राहणाऱ्या एका मेडिकल सेल्समनची मोबाईलमध्ये अचानक ‘सिस्टिम अपडेट’ प्रक्रिया सुरू झाल्यानंतर अज्ञात सायबर भामट्याने २ लाख ५४ हजार २०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शहर पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण दिनेश घोलप (वय ३४, रा. रूम क्र. बी-१, दलाल हाऊस, अभ्युदयनगर, नाचणे रोड, रत्नागिरी) हे मेडिकल सेल्समन म्हणून कार्यरत आहेत. बुधवारी (ता. २९) सकाळी साडेनऊ ते साडेदहाच्या दरम्यान ते घरी असताना त्यांच्या मोबाईलमध्ये अचानक ‘सिस्टिम अपडेट’ची प्रक्रिया सुरू झाली. त्यानंतर काही वेळातच त्यांच्या आयसीआयसी बँकेच्या क्रेडिट कार्डवरून पाच स्वतंत्र व्यवहारांद्वारे एकूण २ लाख ५० हजार रुपये वळते करण्यात आले. याशिवाय त्यांच्या बचत खात्यातून यूपीआयद्वारे ४ हजार २०० रुपयेही डेबिट झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.
तपासात फिर्यादी यांच्या मोबाईलमध्ये ‘गुगल आयपीटीव्ही’ नावाचे अॅप डाउनलोड झाल्यानंतर ही बनावट सिस्टिम अपडेट प्रक्रिया सुरू झाल्याचे समोर आले. त्याद्वारे अज्ञात सायबर गुन्हेगारांनी त्यांच्या बँक खात्यांची माहिती मिळवून एकूण २ लाख ५४ हजार २०० रुपयांची ऑनलाईन फसवणूक केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर नारायण घोलप यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञाताविरुद्ध गुन्हा दाखल केला असून शहर पोलिस ठाण्याचे पोलिस कर्मचारी या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.
पोलिसांकडून नागरिकांना आवाहन आवाहन
मोबाईलवर अचानक येणाऱ्या कोणत्याही संशयास्पद अपडेट किंवा लिंकवर क्लिक करू नये, तसेच प्ले स्टोअर किंवा अॅप स्टोअर व्यतिरिक्त अन्य कोणत्याही ठिकाणाहून APK फाईल्स डाऊनलोड करू नयेत. मोबाईलमध्ये कोणतेही अनाहूत अॅप आल्यास तात्काळ इंटरनेट बंद करून बँक खाती ब्लॉक करावीत. फसवणूक झाल्यास नागरिकांनी तत्काळ १९३० या हेल्पलाईन क्रमांकावर वा cybercrime.gov.in या पोर्टलवर संपर्क साधावा. अशा प्रकारच्या सायबर फसवणुकीपासून सावध राहण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.