दापोली-खेड महामार्गावर भीषण अपघातात तरुणीचा मृत्यू
दापोली:- दापोली तालुक्यातून एक हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. येथील एक नर्सिंग शिकणारी तरुणी आपल्या एका मैत्रिणीसोबत दुचाकीने घरी जात होती. घरी जात असताना झालेल्या अपघातात एका तरुणीचा जागीच मृत्यू झाला. तर दुसरी तरुणी गंभीर जखमी झाली आहे. प्राथमिक तपासानुसार हा अपघात असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र त्या स्वत: घसरून पडल्या की त्यांना इतर कुठल्या वाहनाने धडक दिली? याचं गूढ निर्माण झालं आहे. पोलीस नेमक्या कारणाचा शोध घेत आहेत.
सेजल भागवत असं मृत पावलेल्या तरुणीचं नाव आहे. तर वैष्णवी चंद्रकांत अहिरे या अपघातात गंभीर जखमी झाली आहे. सेजल ही ‘रामराजे कॉलेज ऑफ नर्सिंग’मध्ये शिक्षण घेत होती. तर वैष्णवी मुंबईत नर्सिंगचं शिक्षण घेत होती. घटनेच्या दिवशी दोघीही एकाच दुचाकीने दापोलीहून आपल्या घरी जात होत्या. मात्र घरी पोहोचायच्या आधीच त्यांच्यावर काळाने घाला घातला. ज्यात सेजलचा जागीच मृत्यू झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शेजल आणि वैष्णवी या दोघी दापोलीहून आपल्या घरी जाण्यासाठी दुचाकीने निघाल्या होत्या. महाळुंगे परिसराजवळ आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला भीषण अपघात झाला. हा अपघात नेमका कसा झाला आणि दुचाकी घसरली की एखाद्या वाहनाने धडक दिली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालं नाही.
अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी आणि पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गंभीर जखमी झालेल्या वैष्णवीला तत्काळ जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून तिच्यावर उपचार सुरू आहेत. दापोली पोलिसांनी या घटनेची नोंद घेत अपघाताच्या कारणाचा शोध सुरू केला आहे. वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या तरुणीचा असा दुर्दैवी अंत झाल्याने परिसरात अत्यंत हळहळ व्यक्त केली जात आहे.