राजापुरात दोन एसटी बस एकमेकांवर आदळून अपघात
राजापूर: राजापूर कोदवली, रानतळे, धारतळे- रत्नागिरी मार्गावर उतारावर एस.टी. बस चालकाने समोरून येणारी एस. टी. बस पाहुन ब्रेक लावल्याने रस्त्यावरच एस. टी. बस स्लीप झाल्याने या दोन एसटी बस पाठीमागून एकमेकांना धडकुन अपघात झाला. मात्र या दोन्ही एसटी बस चालकांनी दाखविलेल्या प्रसंगावधानामुळे मोठी दुर्घटना टळली आहे. या दोन्ही एसटी बस मधील कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही. मंगळवारी सकाळी १० ते ११ वाजण्याच्या दरम्यान हा अपघात झाला. या अपघातानंतर या दोन्ही बस मधील प्रवाशांना दुसऱ्ऱ्या बसने सोडण्यात आले.
या मार्गावर रस्त्याच्या दोन्ही बाजुला वाढलेली झाडीमुळे वाहन चालकांना समोरून येणारे दुसरे वाहन दिसत नसल्याने अशा अपघातांचा धोका वाढल्याचे यावेळी प्रवाशांनी सांगितले.
राजापूर आगाराची राजापूरकडून पेंडखळे चिपटेवाडीकडे जाणारी एस. टी. बस घेऊन चालक सतीश हजारे व वाहक बी. डी. सरनाईक हे चिपटेवाडीकडे जात होते. तर कशेळीकडून राजापूरकडे येणारी एस. टी. बस घेऊन चालक संतोष इंगळे व वाहक दळवी हे येत होते. या मार्गावर उतरावर समोरून येणारे राजापूर पेंडखळे बस समोर आल्याने कशेळी राजापूर गाडीच्या चालकाने ब्रेक मारला, मात्र पावसामुळे रस्ता निसरडा झाल्याने गाडी फिरली व समोरून येणाऱ्या राजापूर चिपटेवाडी बसवर आदळली, मात्र चिपटेवाडी एसटी बस चालकाने तात्काळ प्रसंगावधान दाखवत गाडी रस्त्याच्या बाहेर ओढल्याने मोठा अनर्थ टळला. यावेळी कशेळी राजापूर गाडीत २६ तर राजापूर चिपटेवाडी गाडीत १३ प्रवाशी प्रवास करत होते. मात्र या दोन्ही चालकांनी दाखविलेल्या प्रसंगावाधानामुळे कोणत्याही प्रवाशाला दुखापत झाली नाही व मोठा अनर्थही टळला आहे.
या अपघाताची माहिती मिळताच राजापूर आगार प्रमुख काव्या पेडणेकर, स्थानक प्रमुख स्वप्नील कदम, पंकज गार्डी यांसह तांत्रिक विभागातील कर्मचाऱ्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. या दोन्ही बस मधील प्रवाशांना दुसऱ्या एसटीबस उपलब्ध करून देत त्यांना सुरक्षित त्यांच्या इच्छीत स्थळी सोडण्यात आले.
या प्रकरणी राजापूर आगाराकडून पोलीस स्थानकात अपघाताबाबत खबर देण्यात आली असून पोलीसांकडुन अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
या रस्त्यावर गेल्या काही वर्षात वाहतुक मोठया प्रमाणावर वाढली आहे. मात्र या रस्त्याच्या देखभाल दुरूस्तीबाबत सार्वजनिक बांधकाम उपविभाग राजापूरकडून योग्य प्रकारे लक्ष दिले जात नाही अशा प्रवाशांच्या व वाहन चालकांच्या तक्रारी आहेत. या रस्त्याच्या दोन्ही बाजुला साईटपट्टीही योग्य पध्दतीने भरलेली नाही. तर या पावसाळयात या रस्त्याच्या दोन्ही बाजुला मोठया प्रमाणावर झाडी वाढली आहे. ही वाढलेली झाडी तोडण्याबाबतही या विभागाने कार्यवाही केलेली नाही. त्यामुळे असे अपघात होत असुन या विभागाला जाग कधी येणार असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.