NEET पेपरफुटीप्रकरणी केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; रत्नागिरीत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी :
देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी निगडित असलेल्या ‘नीट’ (NEET) परीक्षेतील कथित पेपरफुटी आणि गैरप्रकारांची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी जोरदार मागणी रत्नागिरीतील नागरिकांनी केली आहे. यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात सोमवारी (२० जुलै) निवेदन देण्यात आले.
निवेदनात नमूद केल्यानुसार, NEET परीक्षेच्या पारदर्शकता आणि विश्वासाहर्तेबाबत देशभरात गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत. या कथित गैरप्रकारामुळे लाखो विद्यार्थी व पालकांमध्ये अत्यंत अस्वस्थतेचे आणि अविश्वासाचे वातावरण निर्माण झाले आहे. शिक्षण व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास अबाधित राहण्यासाठी या संपूर्ण प्रकरणाची निष्पक्ष, सखोल आणि वेळेत चौकशी होणे अत्यंत आवश्यक आहे.
तसेच, शिक्षण व्यवस्थेतील या गंभीर त्रुटींची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तत्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी आग्रही मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. हे निवेदन केंद्र सरकार व संबंधित विभागाकडे तातडीने पाठवून योग्य ती दखल घ्यावी, अशी विनंतीही यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना करण्यात आली.
या निवेदनावर प्रथमेश गोरे, छाया कोकरे, अमोल पवार, सूरज सावंत यांच्यासह स्थानिक नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
