इनरव्हील क्लबचा पदग्रहण समारंभ संपन्न; अध्यक्षपदी सुवर्णा चौधरी
रत्नागिरी:-
इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या 2026-27 या नव्या वर्षाची सुरुवात 1 जुलैपासून झाली असून, यानिमित्त आयोजित नियमित सभेत नव्या पदाधिकाऱ्यांचा पदग्रहण समारंभ साधेपणाने पार पडला. माजी अध्यक्षा डॉ. स्वप्ना करे आणि ऋचा गांधी यांच्या हस्ते नव्या कार्यकारिणीकडे पदभार सोपविण्यात आला.
यावेळी अध्यक्षपदी सौ. सुवर्णा चौधरी, सचिवपदी डॉ. प्रियांका कांबळे, खजिनदारपदी सौ. आशा सनगर तसेच आय.एस.ओ. म्हणून प्रज्ञा गांधी यांनी पदभार स्वीकारला. नव्या कार्यकारिणीने सामाजिक बांधिलकी जपत विविध लोकहिताचे उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
इनरव्हील क्लब ही जगातील सर्वात मोठ्या महिला स्वयंसेवी संस्थांपैकी एक असून, मैत्री वाढविणे, समाजातील वंचित व गरजू घटकांना मदत करणे तसेच विविध संस्कृतींचा आदर राखत मानवतावादी कार्यात योगदान देणे ही संस्थेची प्रमुख उद्दिष्टे आहेत.
पदभार स्वीकारल्यानंतर अध्यक्ष सुवर्णा चौधरी यांनी मुलांचे, महिलांचे आणि ज्येष्ठ नागरिकांचे हित लक्षात घेऊन विविध उपक्रम राबविण्यात येतील, तसेच पर्यावरण संवर्धन, आरोग्य जनजागृती आणि सामाजिक विकासासाठी सातत्याने कार्य केले जाईल, अशी ग्वाही दिली. संस्थेच्या प्रगतीसाठी सर्व सदस्यांना सोबत घेऊन प्रामाणिकपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.