तेली आळीतील पाणीटंचाईच्या समस्येवर मोठा दिलासा
नगरसेवक अमित विलणकर यांच्या पुढाकाराने विहिरीचे पुनरुज्जीवन
रत्नागिरी:
रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील प्रभाग क्रमांक १५ मधील तेली आळी येथील तब्बल २५ ते ३० वर्षांपासून दुर्लक्षित असलेली विहीर आता पुन्हा एकदा स्थानिक नागरिकांसाठी जीवनदायी ठरली आहे. नगरसेवक अमित विलणकर यांच्या पुढाकाराने आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या सहकार्यातून या विहिरीचे पुनरुज्जीवन करण्यात आले असून, यामुळे परिसरातील पाणीटंचाईची समस्या काही प्रमाणात निवळली आहे.
तेली आळी येथील राजाशेठ नरवणकर यांच्या मालकीची ही विहीर एकेकाळी परिसरातील नागरिकांच्या पिण्याच्या पाण्याचा मुख्य स्रोत होती. मात्र, काळाच्या ओघात विहिरीत मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने ती वापराविना दुर्लक्षित झाली होती. सध्या वाढत्या पाणीटंचाईचा विचार करता, या विहिरीचा वापर करणे आवश्यक असल्याचे प्रभाग क्रमांक १५ चे नगरसेवक अमित वसंत विलणकर यांच्या निदर्शनास आले.
नगरसेवक अमित विलणकर यांनी रत्नागिरी नगरपालिकेच्या सहकार्याने या विहिरीच्या स्वच्छतेचा आणि पुनरुज्जीवनाचा निर्णय घेतला. ज्येष्ठ नेते व सामाजिक कार्यकर्ते दीपक राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विहिरीची स्वच्छता करण्यात आली. या कामामुळे अनेक वर्षांनंतर विहिरीतील गाळ काढला गेल्याने तिची पाणी साठवण्याची क्षमता वाढली असून, भूजल पातळीतही सुधारणा झाली आहे.
या उपक्रमामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. “जलस्रोतांचे संवर्धन आणि उपलब्ध पाण्याचा योग्य वापर काळाची गरज आहे,” असे मत व्यक्त करत स्थानिकांनी नगरसेवक आणि मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले आहेत.
या महत्त्वाकांक्षी मोहिमेमध्ये परशुराम (दादा) ढेकणे, राकेश चव्हाण, भाई राऊत यांच्यासह अनेक स्थानिक नागरिकांनी मोलाचे सहकार्य केले. या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.