मिरकरवाडा येथे किरकोळ कारणातून तरुणावर जीवघेणा हल्ला; चौघांवर गुन्हा
रत्नागिरी:-
बहिणीला भेटायला घरी न येण्याचा सल्ला दिल्याचा राग मनात धरून एका १८ वर्षीय तरुणाला रस्त्यात अडवून लोखंडी वस्तू किंवा दगडाने डोके फोडत लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना रत्नागिरी शहरातील खडक मोहल्ला, मिरकरवाडा येथे घडली आहे. या जीवघेण्या हल्ल्यात तरुणीचा भाऊ गंभीर जखमी झाला असून, रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात मुख्य चार आरोपींसह त्यांच्या साथीदारांवर विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याप्रकरणी अजमान दाऊद दर्वे (वय १८, रा. सध्या मिल्लत नगर, शिवाजीनगर, मूळ रा. मस्तान मोहल्ला, मिरकरवाडा) या मच्छी सप्लायर व्यवसाय करणाऱ्या तरुणाने पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांनी याप्रकरणी उसामा पांजरी, उबेद असलम दर्वे, बुरहान मजगावकर आणि कामरान मजगावकर (सर्व रा. मिरकरवाडा, रत्नागिरी) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, मे २०२६ मध्ये आरोपी क्रमांक १ उसामा पांजरी हा फिर्यादी अजमान दर्वे याच्या बहिणीला भेटण्यासाठी त्याच्या शिवाजीनगर येथील घरी गेला होता. त्यावेळी अजमान याने उसामाला ‘माझ्या बहिणीला भेटायला येथे येऊ नकोस’ असे स्पष्ट सांगितले होते. यावरून त्याच दिवशी सायंकाळी मिरकरवाडा येथील चिटनी बाजार येथे त्यांच्यात वादही झाला होता. याच जुन्या वादाचा राग मनात धरून ११ जून २०२६ रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास अजमान काम आटपून खडक मोहल्ला येथून जात असताना आरोपींनी त्याला घेरले.
त्यावेळी समोरून आलेल्या आरोपी उबेद दर्वे याने अजमानच्या हातातील मोबाईलला धक्का दिला आणि ‘आम्हाला मारण्याची धमकी देतोस काय?’ असे म्हणून स्वतःच्या मोबाईलवरून उसामा, बुरहान आणि कामरान यांना बोलावून घेतले.
त्यांच्यासोबत त्यांचे मित्र अब्दुल्ला दर्वेश, रब्बी पांजरी वस्ता आणि मोहिन मजगावकर हे देखील तेथे आले. या सर्वांनी मिळून अजमानचा टी-शर्ट पकडून त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. याच दरम्यान उबेद दर्वे याने रस्त्यावरील दगड उचलून अजमानच्या डोक्यात मारून गंभीर दुखापत केली, तर बुरहान आणि कामरान यांनी त्याला हाताच्या ठोशांनी चेहऱ्यावर व पाठीवर मारून रस्त्यावर पाडले आणि लाथाबुक्क्यांनी तुडवले. ‘जर बाहेरच्या तुझ्या मित्रांना बोलावलेस, तर तुला आणि त्यांना तिथेच ठार मारून टाकू’ अशी धमकी देत आरोपींनी त्याला अश्लील शिवीगाळ केली.
या प्राणघातक हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या अजमान दर्वे याने पोलिसांत धाव घेतली. त्याच्या तक्रारीवरून रत्नागिरी शहर पोलिसांनी संशयित आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहेत.