ॲम्ब्युलन्सला धडक दिल्याप्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:
रत्नागिरी शहरातील आरोग्य मंदिर बस स्टॉपजवळ एसटी बस आणि ॲम्ब्युलन्समध्ये झालेल्या अपघाताप्रकरणी एसटी बस चालकावर रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना ६ जून रोजी घडली असून, १२ जून रोजी उशिरा रात्री याप्रकरणी पोलीस कारवाई करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, ६ जून रोजी सायंकाळी ५.१५ वाजण्याच्या सुमारास फोर्स टेंपो ट्रॅव्हलर ॲम्ब्युलन्स (क्रमांक MH 08 AP 8836) चे चालक सुहास शंकर सनगरे (वय ४४) हे आपले वाहन घेऊन पॉवर हाऊस ते आरोग्य मंदिर लिंक रोडवरून मजगाव रोडच्या दिशेने जात होते. आरोग्य मंदिर बस स्टॉप जवळून रस्ता ओलांडत असताना, मारुती मंदिर ते साळवी स्टॉप मार्गावरून येणाऱ्या एसटी बसने (क्रमांक MH 20 BL 2587) ॲम्ब्युलन्सला धडक दिली.
या अपघाताप्रकरणी एसटी बसचे चालक रविकांत नानासाहेब मिसाळ (वय ३८, सध्या रा. श्रीनगर, खेडशी; मूळ रा. आंबेजोगाई, बीड) यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस उपनिरीक्षक शरद बाबल्या कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, आरोपीने आपली बस बेदरकारपणे आणि धोकादायक रीतीने चालवल्यामुळे हा अपघात घडला.
या प्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.