‘राँग साईड’ने आलेल्या कारची स्कुटरला धडक
महिला व बालकासह तिघे जखमी
रत्नागिरी:
पावस-रत्नागिरी मार्गावर हॉटेल आनंद (भाटये) समोर झालेल्या भीषण अपघातात तीन जण जखमी झाल्याची घटना समोर आली आहे. भरधाव कार चालकाने आपली गाडी चुकीच्या दिशेने वळवून स्कुटरला धडक दिल्याने हा अपघात घडला. याप्रकरणी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १० मे रोजी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास सौ. तेजश्री अमित मोहिले (वय ४०) या आपली प्लेझर स्कुटर (क्रमांक MH 08 AE 8568) वरून सौ. तिर्था चंद्रभूषण मुरकर (वय ६२) आणि कु. माहिशा अमित मोहिले (वय ६ वर्षे) यांना घेऊन रत्नागिरी ते कर्ली या मार्गाने जात होत्या.
दरम्यान, भाटये येथील हॉटेल आनंद समोर पावसकडून रत्नागिरीच्या दिशेने येणाऱ्या स्विफ्ट डिझायर कारच्या (क्रमांक MH 05 FJ 3198) चालक अक्षय दत्ताराम वारीसे (वय ३१, रा. गोळप) याने आपली गाडी रस्त्याची परिस्थिती न पाहता, निष्काळजीपणे आणि अविचाराने चालवून थेट उजव्या बाजूला (राँग साईड) घेतली. या बेजबाबदारपणामुळे कारने समोरील स्कुटरला जोरदार धडक दिली. या अपघातात स्कुटरवरील तेजश्री मोहिले, तिर्था मुरकर आणि ६ वर्षांची माहिशा हे तिघेही जखमी झाले.
या अपघातानंतर ११ मे रोजी मोटर अपघात रजिस्टरमध्ये नोंद करण्यात आली होती. प्रकरणाच्या सखोल चौकशीनंतर, ४ जून २०२६ रोजी रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हेड कॉन्स्टेबल प्रमोद तुकाराम कांबळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून, आरोपी अक्षय वारीसे याच्यावर भारतीय न्यायसंहिता २०२३ च्या कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.