परकार हॉस्पिटलमध्ये आगीची दुर्घटना; प्रसंगावधानाने मोठा अनर्थ टळला
हॉस्पिटल प्रशासनाने गंभीर प्रसंगात सहकार्य करणाऱ्यांचे मानले आभार
रत्नागिरी:
दि. १ जून रोजी सकाळी १०:३० वाजण्याच्या सुमारास परकार हॉस्पिटलमधील डायलिसिस युनिटमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग लागली. या दुर्घटनेमुळे हॉस्पिटल परिसरात एकच खळबळ उडाली. मात्र, हॉस्पिटल प्रशासनाचे प्रसंगावधान आणि तातडीने केलेल्या उपाययोजनांमुळे सर्व रुग्णांचे प्राण वाचले असून, मोठा अनर्थ टळला आहे.
डायलिसिस युनिटमधील वातानुकूलित यंत्रणेत शॉर्ट सर्किट झाल्याने आग लागून सर्वत्र काळा धूर पसरला होता. फायर अलार्म वाजल्यानंतर कर्मचाऱ्यांनी तातडीने हालचाली सुरू करत सर्व रुग्णांना सुरक्षितरीत्या बाहेर काढले. अतिदक्षता विभागातील आणि काही गंभीर रुग्णांना त्वरित चिंतामणी हॉस्पिटल, सिव्हिल हॉस्पिटल, रामनाथ हॉस्पिटल व भोळे हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले.
अग्निशामक दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आगीवर वेळेत नियंत्रण मिळवले. त्यानंतर हॉस्पिटलच्या अपघात विभागात रुग्णांची पुन्हा तपासणी करण्यात आली आणि त्यांना सुरक्षित कक्षात हलवण्यात आले. दुर्दैवी घटनेनंतरही परिस्थितीवर तातडीने नियंत्रण मिळवत सायंकाळी ४ वाजेपर्यंत हॉस्पिटल पुन्हा पूर्ण क्षमतेने सुरू झाले. तसेच, दुसऱ्याच दिवशी सकाळी ६ वाजता डायलिसिस युनिट दुसऱ्या विंगमध्ये कार्यान्वित करण्यात आले.
या कठीण प्रसंगात तहसीलदार श्री. म्हात्रे, पोलीस निरीक्षक विवेक पाटील, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक माईणकर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच हॉस्पिटलचे सर्व कर्मचारी, डॉक्टर्स – विशेषतः डॉ. प्रणाम केंद्रे, प्रफुल्ल मयेकर, विश्वजीत कुळीये आणि विनय मांडवकर यांनी दाखवलेली तत्परता अत्यंत मोलाची ठरली.
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे डीन डॉ. रामानंद, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. जगताप, तसेच डॉ. चेतन औरंगाबादकर, डॉ. भोळे, डॉ. लोटलीकर, डॉ. पराग पाथरे व डॉ. सोनाली पाथरे यांच्यासह अग्निशामक दल, रत्नागिरी नगर परिषद, १०८ रुग्णवाहिका टीम, आस्था फाउंडेशन आणि अन्य सामाजिक कार्यकर्त्यांनी या संकटाच्या काळात मदतीचा हात दिला. रुग्णांच्या नातेवाईकांनीही प्रशासनाला मोलाची साथ दिली.
पत्रकारांच्या जबाबदार वृत्तांकनाचे कौतुक
या संकटकाळात भीतीचे वातावरण कमी करण्यासाठी आणि जनतेपर्यंत खरी माहिती पोहोचवण्यासाठी पत्रकार बंधू-भगिनींनी केलेल्या जबाबदार वृत्तांकनाचे हॉस्पिटल प्रशासनाने विशेष आभार मानले आहेत.
परकार हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. अलिमिया परकार आणि कार्यकारी संचालक डॉ. मतीन परकार यांनी या कठीण प्रसंगात सहकार्य करणाऱ्या सर्वांचे मनापासून आभार मानले असून, हॉस्पिटल प्रशासन या सर्वांचे सदैव ऋणी राहील, अशी भावना व्यक्त केली आहे.
