कोकण विधान परिषदेसाठी सर्व अर्ज वैध; ४ जून माघारीचा शेवटचा दिवस
रत्नागिरी:
महाराष्ट्र विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदार संघाच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी पार पडली. निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या एकूण सहाही उमेदवारांचे १२ नामनिर्देशन पत्र निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी वैध घोषित केले आहेत. त्यामुळे आता निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून, उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ जून हा अंतिम दिवस निश्चित करण्यात आला आहे.
निवडणूक निरीक्षक अभय महाजन यांच्या उपस्थितीत मंगळवारी सकाळी ११ वाजता निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या दालनात अर्जांची छाननी करण्यात आली. यावेळी उपस्थित उमेदवारांना आणि त्यांच्या प्रतिनिधींना आक्षेप नोंदवण्याची संधीही देण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर सर्व ६ उमेदवारांचे एकूण १२ नामनिर्देशन पत्र वैध ठरल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी मनुज जिंदल यांनी दिली.
निवडणूक प्रक्रियेत दाखल झालेल्या उमेदवारांची आणि त्यांच्या अर्जांमध्ये सुरेंद्रनाथ यशवंत माने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांचे ४, अनिकेत सुनिल तटकरे (नॅशलिस्ट काँग्रेस पार्टी) ४, जुईली महेंद्र दळवी अपक्ष १, अरविंद पुंडलिक म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) १, अनिल रमेश चोपडा (अपक्ष) १ आणि मानसी संतोष म्हात्रे (शेतकरी कामगार पक्ष) यांचा १ असे 12 अर्ज आहेत.
या छाननी प्रक्रियेवेळी निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सूर्यवंशी यांच्यासह सर्व संबंधित उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. आता सर्वांचे लक्ष ४ जून या माघारीच्या दिवसाकडे लागले असून, त्यानंतरच निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.