देवरूख नजिक गावठी दारूची भट्टी उद्ध्वस्त
४७ हजारांचा मुद्देमाल जप्त
संगमेश्वर:
देवरूख पोलीस ठाण्याच्या पथकाने एका धाडसी कारवाईत मौजे देवरूख पर्शरामवाडी येथील जंगलमय भागात सुरू असलेली गावठी हातभट्टीची मोठी दारूची भट्टी उद्ध्वस्त केली आहे. या कारवाईत पोलिसांनी ४७ हजार ६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असून, एका ६० वर्षीय इसमावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १ जून रोजी सकाळी १०.२५ वाजण्याच्या सुमारास देवरूख पोलीस ठाण्यातील पोलीस कॉन्स्टेबल तेजस मारुती देशमुख हे आपल्या पथकासह गस्तीवर होते. यावेळी त्यांना देवरूख पर्शरामवाडी येथील बांबर पऱ्याच्या बाजूला असलेल्या जंगलमय भागात बेकायदेशीर हातभट्टी दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. पोलिसांच्या पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली असता, तिथे यशवंत शिवराम बेटकर (वय ६०, रा. मेघी बौद्धवाडी, ता. संगमेश्वर) हा इसम कोणत्याही परवान्याशिवाय गावठी दारू गाळताना मिळून आला.
पोलीस पथकाने घटनास्थळावरून दारू गाळण्यासाठी वापरले जाणारे रसायन, तयार दारू आणि इतर साहित्याचा असा एकूण ४७,६५० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल तेजस देशमुख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देवरूख पोलीस ठाण्यात आरोपी यशवंत बेटकर याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायद्याचे कलम ६५ (ब), (क), (ड), (फ) आणि (ई) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.