पती-पत्नीच्या बँक खात्यातून सव्वा दोन लाख लंपास
संगमेश्वर नावडी येथील घटना
संगमेश्वर:
डिजिटल युगात ऑनलाईन फसवणुकीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले असून, संगमेश्वर तालुक्यातही असाच एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका अज्ञात सायबर चोरट्याने पती आणि पत्नी दोघांच्याही बँक खात्यावर डल्ला मारत तब्बल २ लाख १४ हजार १४८ रुपयांची ऑनलाईन फसवणूक केली आहे. या प्रकरणी संगमेश्वर पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, फिर्यादी तौफिक जिकर मेमन (वय ३९ वर्षे, रा. नावडी, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) हे संगमेश्वर नावडी येथे किराणा मालाचे दुकान चालवून आपला उदरनिर्वाह करतात. ३० मे रोजी सायंकाळी ६ वाजून २७ मिनिटे ते रात्री ७ वाजून १२ मिनिटांच्या दरम्यान हा फसवणुकीचा प्रकार घडला.
या कालावधीत अज्ञात आरोपीने फिर्यादी तौफिक मेमन यांच्या बँक ऑफ इंडिया, शाखा संगमेश्वर या बँकेच्या खात्यामधून ८९,१४९ रुपये ऑनलाईन पद्धतीने काढून घेतले. चोरट्याने केवळ तौफिक यांच्याच खात्यावर समाधान न मानता, त्यांच्या पत्नी फौजिया तौफिक मेमन यांच्याही बँक खात्याला लक्ष्य केले. आरोपीने फौजिया यांच्या खात्यामधून १,२४,९९९ रुपये असे एकूण २ लाख १४ हजार १४८ रुपये ऑनलाईन चोरून नेले.
आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तौफिक मेमन यांनी तत्काळ पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यानुसार १ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात इसमाविरुद्ध गु.र.नं. ६१/२०२६ नुसार भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ चे कलम ३१८(४) आणि माहिती तंत्रज्ञान अधिनियम २००० चे कलम ६६ (सी) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. या प्रकरणात अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. संगमेश्वर पोलीस या ऑनलाईन आर्थिक फसवणुकीचा अधिक तपास करत असून सायबर सेलचीही मदत घेतली जात आहे. नागरिकांनी आपल्या बँकेचे गोपनीय तपशील कोणाशीही शेअर करू नयेत, असे आवाहन पोलिसांकडून केले जात आहे.