महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांचा शक्तीप्रदर्शनाने उमेदवारी अर्ज दाखल
रत्नागिरी:
विधानपरिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघासाठी महायुतीचे अधिकृत उमेदवार अनिकेत तटकरे यांनी सोमवार, १ जून रोजी रत्नागिरीत जनसमुदायाच्या आणि दिग्गज नेत्यांच्या साक्षीने प्रचंड शक्तीप्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांच्याकडे सादर केला. उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी रत्नागिरीतील हॉटेल विवेक येथे महायुतीच्या मतदारांचा एक ऐतिहासिक आणि भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यातील नेत्यांची अभेद्य एकजूट आणि मतदारांचा अथांग उत्साह पाहता, विरोधकांचे अस्तित्व शोधण्यासाठी आता दुर्बीणच घ्यावी लागेल, असा थेट इशारा या व्यासपीठावरून देण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याला रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सभापती, नगरपरिषद व नगरपालिकांचे नगराध्यक्ष, नगरसेवक आणि श्री सदस्य प्रचंड संख्येने उपस्थित होते.
या महामेळाव्याला महायुतीचे सर्वच प्रमुख शिलेदार एकाच व्यासपीठावर अवतरले होते. व्यासपीठावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे, उद्योगमंत्री उदय सामंत, मंत्री नितेश राणे, मंत्री अदिती तटकरे, आमदार दीपक केसरकर, आमदार निरंजन डावखरे, आमदार प्रमोद जठार, आमदार शेखर निकम, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेंद्र थोरवे, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडित, जिल्हा परिषद अध्यक्ष अस्मिता केंद्रे, भाजप जिल्हाध्यक्ष प्रशांत यादव आणि जिल्हा अध्यक्ष बाबाजी जाधव यांसह महायुतीचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी सविस्तर बोलताना उद्योगमंत्री उदय सामंत यांनी अनिकेत तटकरे यांच्या विजयाचा शंभर टक्के विश्वास व्यक्त केला. ते म्हणाले की, महायुतीची ही ताकद पाहता अनिकेत तटकरे समोरच्या उमेदवाराचे डिपॉझिट जप्त करून विधानपरिषदेत आमदार म्हणून डौलाने बसतील यात शंका नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः रात्री ३ वाजेपर्यंत माझ्या प्रवासाचे आणि येथील तयारीचे ट्रॅकिंग करत होते. त्यांनी मला फोन करून स्पष्ट संदेश दिला आहे की, स्वतः डॉ. श्रीकांत शिंदे हेच या निवडणुकीला उभे आहेत असे समजून शिवसेनेच्या प्रत्येक कार्यकर्त्याने आणि पदाधिकाऱ्याने संपूर्ण ताकदीने प्रचारात उतरावे. रत्नागिरी नगरपालिकेत आमचे २९ सदस्य असले तरी अनिकेत तटकरेंना ३२ पैकी ३२ मते पडतील. इतकेच नव्हे तर लांजा, राजापूर, खेड, दापोली, मंडणगड, गुहागर, देवरुख येथील स्वीकृत सदस्यांचे शंभर टक्के मतदान महायुतीलाच होईल, असा शब्द मी या व्यासपीठावरून देत आहे.
आपल्या धडाकेबाज आणि आक्रमक शैलीत बोलताना आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, महायुतीचे हे सर्व दिग्गज खेळाडू आणि नेते एकत्र आल्यावर आता समोर विरोधक शिल्लक उरलाच कुठे? जंगलात दोन सिंह असले तरी काही अडचण नसते, आम्ही सगळे जुने हेवेदावे विसरून पूर्ण ताकतीने ही निवडणूक जिंकण्यासाठी मैदानात उतरलो आहोत. या ऐतिहासिक आणि विक्रमी विजयात भारतीय जनता पक्षाचा सिंहाचा वाटा असेल. अनिकेत तटकरे यांनी गेल्या 6 वर्षांच्या आपल्या कार्यकाळात कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी आणि विशेषतः किनारपट्टी भागातील नागरिकांचे उत्पन्न वाढवण्यासाठी उल्लेखनीय काम केले आहे. त्यांच्या या जनसंपर्कामुळे आणि विकासकामांच्या जोरावर त्यांचा विजय ही काळ्या दगडावरची रेघ आहे, हे विरोधकांनी आताच लिहून ठेवावे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि खासदार सुनील तटकरे यांनी आपल्या भाषणातून विरोधकांच्या अपप्रचाराचा फुगा पूर्णपणे फोडला. ते म्हणाले की, राज्यातील महायुती अत्यंत भक्कम आणि एकसंध असून जागावाटपाबाबत आमच्यात कोणताही वाद नाही. विरोधकांकडून महायुतीमध्ये बिघाडी असल्याच्या केवळ वावड्या उठवल्या जात आहेत, परंतु आजचे हे विराट व्यासपीठ आणि मतदारांची झालेली गर्दी हीच आमच्या एकतेची आणि अथांग ताकदीची सर्वात मोठी जिवंत साक्ष आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या खंबीर नेतृत्वाखाली सर्वच मतदारसंघांत महायुतीचे उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी होतील. या अभूतपूर्व शक्तीप्रदर्शनामुळे कोकण विधानपरिषद निवडणुकीत महायुतीने प्रचाराचा प्रचंड धडाका उडवून दिला असून विरोधकांचे धाबे पार दणाणले आहेत.