बाळ माने यांनी दाखल केला उमेदवारी अर्ज
अनिकेत तटकरेंवर साधला निशाणा
रत्नागिरी:
कोकण स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आज आपला उमेदवारी अर्ज अधिकृतपणे दाखल केला. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या भक्कम पाठिंब्याचा दावा करत, मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवरून सत्ताधारी महायुतीवर जोरदार टीका केली.
उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना बाळ माने म्हणाले की, “महाविकास आघाडीतील सर्व घटक पक्ष आज माझ्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत. एकूण २०१८ मतदारांचा हा मतदारसंघ असून, राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे मतदार मला आपला कौल देतील, असा मला विश्वास आहे.”
गेल्या १२ वर्षांत कोकण विधान परिषद मतदारसंघाचे अनेक मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत, असा आरोप करत बाळ माने यांनी या समस्या सोडवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे सांगितले. या मतदारसंघाच्या विकासासाठी आणि प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी आपण प्राधान्याने काम करू, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी बाळ माने यांनी महायुतीचे उमेदवार अनिकेत तटकरे यांच्यावर निशाणा साधला. “अनिकेत तटकरे हे केवळ निवडणुकीचा फॉर्म भरण्यापुरतेच कोकणात येतात,” अशी थेट टीका करत त्यांनी तटकरेंच्या सक्रियतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
महाविकास आघाडीकडून बाळ माने यांच्या उमेदवारीमुळे कोकण विधान परिषदेची निवडणूक आता अधिक चुरशीची होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. एकीकडे महायुतीकडून अनिकेत तटकरे तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडून बाळ माने, अशा या लढतीत आता आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत.