स्वातंत्र्यवीर सावरकर जयंतीनिमित्त रत्नागिरी भाजपाकडून अभिवादन
‘भारत माता की जय’च्या घोषणांनी दुमदुमला गाडीतळ परिसर
रत्नागिरी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त आज रत्नागिरी शहरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. स्वातंत्र्यवीरांच्या स्मृतींना उजाळा देण्यासाठी अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी पुढाकार घेतला.
भारतीय जनता पार्टी, रत्नागिरीच्या वतीने गाडीतळ येथील स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांनी ‘स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचा विजय असो’, ‘भारत माता की जय’, ‘जय श्रीराम’ अशा घोषणा देत परिसर दणाणून सोडला. या प्रसंगी भाजप महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा वर्षाताई ढेकणे, जिल्हा सरचिटणीस ओंकार फडके, शहराध्यक्ष दादा ढेकणे, राजेंद्र पटवर्धन, मनोज पाटणकर, निलेश आखाडे, नगरसेवक संदीप सुर्वे, नितीन जाधव, शमी हरचेकर, विजया भाटकर यांच्यासह भाजपाचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान मान्यवरांनी सावरकरांच्या त्याग, विज्ञाननिष्ठा आणि अखंड भारताच्या संकल्पनेचा जागर केला. ‘सावरकरांचे विचार आजच्या युवापिढीसाठी प्रेरणादायी आहेत. त्यांच्या कार्याचा वसा पुढे नेणे हीच खरी आदरांजली ठरेल,’ असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. शांततेत व उत्साहात पार पडलेल्या या अभिवादन कार्यक्रमामुळे गाडीतळ परिसर देशभक्तीमय वातावरणाने भारावून गेला होता.