बलात्कार प्रकरणात 2 तरुणांची निर्दोष मुक्तता
गुहागर:
पीडित महिलेने केलेल्या बलात्काराच्या तक्रारीतून पुराव्याअभावी वैभव सिताराम ठोंबरे आणि शिवराम हरी आंबेकर या दोन तरुणांची चिपळूण सत्र न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. ही घटना गुहागरमधील शिर येथील असून, जुन्या वादातून खोटा गुन्हा दाखल केल्याचा दावा आरोपींच्या वकिलांनी केला होता.
गुहागरमधील शिर येथील पीडित महिलेने वैभव ठोंबरे आणि शिवराम आंबेकर यांच्यावर बलात्कार केल्याचा आरोप करत गुन्हा दाखल केला होता. या प्रकरणी गुहागर पोलीस ठाण्यात भा.दं.वि. कलम ३७६ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. सरकार पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार तपासण्यात आले होते.
उलटतपासात उघड झालेली सत्यता
आरोपींतर्फे ॲड. सुधीर शरद बुटाला आणि ॲड. समीर शरद शेठ यांनी खटला लढवला. उलटतपासादरम्यान काही महत्त्वाच्या बाबी समोर आल्या ज्यामध्ये फिर्यादीचे घर भाटलेवाडीत असून, आजूबाजूला अनेक घरे आहेत. त्यामुळे पीडित महिलेने आरडाओरडा केल्यास शेजाऱ्यांना ऐकू जाणे शक्य होते, मात्र तसे घडले नाही. तसेच जुलै २०१७ मध्ये पैशांच्या वादातून फिर्यादीने आरोपींविरुद्ध तक्रार दिली होती. त्यावेळी तिने अत्याचाराचा कोणताही उल्लेख केला नव्हता. आरोपी क्र. २ ने फिर्यादीविरुद्ध शिवीगाळ व धमकीची तक्रार केली होती, त्या केसला शह देण्यासाठीच हे बलात्कार प्रकरण बनावटरीत्या रचल्याची शक्यता नाकारता येत नाही. दागिने गहाण ठेवून आरोपीला पैसे दिल्याचा कोणताही कागदोपत्री पुरावा सरकारी पक्षाला न्यायालयात सादर करता आला नाही.
सर्व साक्षी-पुरावे आणि ॲड. समीर शेठ यांचा युक्तिवाद विचारात घेता, मेहरबान जिल्हा न्यायाधीश चिपळूण यांनी आरोपींवरील आरोप सिद्ध होत नसल्याचे निरीक्षण नोंदवून दोन्ही संशयितांची निर्दोष मुक्तता केली. या निकालामुळे आरोपींना मोठा दिलासा मिळाला आहे.