रिक्षाचालकाच्या मृत्यू प्रकरणी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल
संगमेश्वर:
रत्नागिरी-कोल्हापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६६ वर साखरपा गोवरेवाडी (ता. संगमेश्वर) येथे एका अज्ञात वाहनाने रिक्षाला समोरासमोर जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात रिक्षाचालकाचा सिव्हिल हॉस्पिटल, रत्नागिरी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला. हा अपघात २२ मे २०२६ रोजी घडला असून, याप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्यात अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सुरेश शामराव साळोखे (वय ६६ वर्षे, रा. बागल चौक, कोल्हापूर) असे अपघातात मृत्यू झालेल्या रिक्षाचालकाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मृत सुरेश साळोखे हे आपल्या मालकीची रिक्षा (क्रमांक MH-09/EL-2608) घेऊन कोल्हापूर कणेरी मठ येथून बेकरी पदार्थांचे बॉक्स भरून गणपतीपुळेच्या दिशेने जात होते. २२ मे रोजी त्यांची रिक्षा साखरपा गोवरेवाडी गावाच्या हद्दीत आली असता, रत्नागिरी बाजूकडून येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या रिक्षाला समोरून जोरदार धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की रिक्षा रस्त्यावरच पलटी झाली. या अपघातात रिक्षाचालक साळोखे यांच्या डोक्याला आणि शरीरावर इतर ठिकाणी गंभीर दुखापती झाल्या. तसेच रिक्षाचेही मोठे नुकसान झाले.
उपचारादरम्यान मृत्यू आणि गुन्हा दाखल
अपघातानंतर गंभीर जखमी झालेल्या साळोखे यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालय, रत्नागिरी येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली.
या घटनेप्रकरणी देवरुख पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक (सपोफौ) शांताराम सिताराम पंदेरे (वय ५१) यांनी २३ मे रोजी रात्री ८ वाजता फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात वाहन आणि त्याच्या चालकाविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा रजि. नं. ८०/२०२६ नुसार दाखल करण्यात आला आहे. अपघात करून पळून गेलेल्या अज्ञात वाहनाचा आणि चालकाचा शोध देवरुख पोलीस घेत आहेत.