मोरोशीतील वृद्धाचा चक्कर येऊन मृत्यू
राजापूर : पायवाटेने घराकडे जात असताना पायाला अज्ञात जीव चावल्याने चक्कर येऊन जमिनीवर पडलेल्या मोरोशी काकयेवाडी येथील ६५ वर्षीय वृद्धाचा रत्नागिरी जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. मोतीराम शंकर पवार असे मृत वृद्धाचे नाव आहे. या घटनेची नोंद राजापूर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मोतीराम पवार हे शेजाऱ्यांकडून पायवाटेने घराकडे परतत होते. यावेळी अचानक त्यांच्या पायाला काहीतरी चावल्याची जाणीव झाली. नेमके काय चावले हे पाहण्यासाठी त्यांनी हातातील बॅटरीच्या सहाय्याने परिसरात शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचवेळी त्यांना तीव्र चक्कर आली आणि ते जमिनीवर कोसळले. खाली पडल्याने त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच उजव्या हाताच्या खांद्याला मुकामार लागून त्वचा काळपट पडल्याचेही निदर्शनास आले. घटनेनंतर नातेवाईकांनी त्यांना तातडीने निखरे प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. त्यानंतर १९ मे रोजी सकाळी त्यांना पाचल येथील खासगी रुग्णालयात हलविण्यात आले. पुढील उपचारासाठी त्यांना
रायपाटण ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले; मात्र प्रकृती गंभीर असल्याने डॉक्टरांनी त्यांना १०८ रुग्णवाहिकेद्वारे रत्नागिरी येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात पाठविले. रत्नागिरी येथे दाखल केल्यानंतर १९ मे रोजी सायंकाळी सव्वासात वाजण्याच्या सुमारास वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी करून त्यांना उपचारापूर्वीच मृत घोषित केले.