विनापरवाना हातभट्टी दारु विक्रीवर पोलिसांचा छापा
२२ लिटर दारु जप्त ; जयगड, ग्रामीण व शहर पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी, ः तालुक्यातील जयगड-बौद्धवाडी, भाट्ये आणि कुरतडे पालवकरवाडी या ठिकाणी ग्रामीण, जयगड, शहर पोलिसांनी विनापरवाना हातभट्टीची दारु विक्रीवर कारवाई केली. या कारवाई ठिक-ठिकाणी २ हजार २४५ रुपयांची २२ लिटर दारु जप्त केली असून संशयितांविरुद्ध त्या-त्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सादिक आदम सोलकर (वय ६१, रा. जयगड, अकबर मोहल्ला, रत्नागिरी), अशोक बाळकृष्ण पोतदार (वय ६८, रा. नाचणे रोड, पॉवर हाऊस रत्नागिरी)
य़शवंत तुकाराम पालवकर (वय ७०, रा. कुरतडे पालवकरवाडी, रत्नागिरी) अशी विनापरवाना हातभट्टीची दारु विक्री करणाऱ्या संशयितांची नावे आहेत. या घटना शनिवारी (ता. २३) दुपारी व रात्रीच्या सुमारास जयगड-बौद्धवाडी, भाट्ये, आणि कुरतडे येथे निदर्शनास आल्या. पोलिसांनी या कारवाई संशयितांकडून एकूण २ हजार २४५ रुपयांची २२ लिटर जप्त केली. या प्रकरणी पोलिस शिपाई शिवम आंबुलकर-जयगड, महिला पोलिस हेड कॉन्स्टेबल पुनम ढवळ-शहर व पोलिस हेड कॉन्स्टेबल रुपेश भिसे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात संशयितांविरुद्ध तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी जयगड, शहर व ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास त्या-त्या पोलिस ठाण्याचे अमंलदार करत आहेत.