गावठी बॉम्ब स्फोट प्रकरणी गुन्हा दाखल
रत्नागिरी:
प्राण्यांची किंवा पक्ष्यांची शिकार करण्यासाठी अज्ञात व्यक्तीने लपवून ठेवलेल्या गावठी बॉम्बचा अचानक स्फोट झाला. या भीषण स्फोटात एका ४७ वर्षीय महिलेच्या डाव्या हाताची बोटे तुटून ती गंभीर जखमी झाली आहे. १९ मे रोजी सकाळी ६:४५ वाजण्याच्या सुमारास जांभारी फाटा येथील ‘भूतबंगला’ परिसराच्या पाठीमागील जागेत ही घटना घडली. या प्रकरणी अज्ञातावर रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, वाटद खंडाळा (जांभारी फाटा) येथील रहिवासी सौ. रेश्मा प्रमोद सुर्वे (वय ४७) आणि त्यांचे पती प्रमोद केशव सुर्वे हे सकाळी घराच्या कुंपणासाठी तोडून आणलेले चिवे (बांबूचे तुकडे) घराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत साफ करत होते. काही वेळानंतर पती प्रमोद हे पाणी पिण्यासाठी घराकडे गेले, तर रेश्मा या तिथेच काम करत होत्या. जमिनीवर ठेवलेले बांबू रेश्मा सुर्वे या जेव्हा उचलत होत्या, नेमक्या त्याच वेळी बांबूंच्या खाली अज्ञात शिकार्याने लपवून ठेवलेल्या गावठी बॉम्बचा जोरदार स्फोट झाला.
हा स्फोट इतका भयानक होता की, त्यात रेश्मा सुर्वे यांच्या डाव्या हाताची बोटे जागेवरच तुटली. अचानक झालेल्या या स्फोटामुळे परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे. जखमी महिलेला तातडीने रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी जखमी महिला सौ. रेश्मा सुर्वे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी याप्रकरणी भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२५(अ), १२५(ब), २८८ सह भारतीय स्फोटक पदार्थ अधिनियम १९०८ चे कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
वन्य प्राण्यांची बेकायदेशीर शिकार करण्यासाठी हा गावठी बॉम्ब तिथे कोणी ठेवला होता? याबाबत पोलीस कसून तपास करत आहेत. यावेळी पोलीस तपासात २९ गावठी बॉम्ब जप्त करण्यात आले. या घटनेमुळे ग्रामीण भागात शिकारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जीवघेण्या स्फोटकांचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.