दापोलीत प्रतिबंधित गुटखा, सुगंधित तंबाखू जप्त
दुकानदारावर गुन्हा दाखल
दापोली:
अन्न व औषध प्रशासन आणि पोलिसांनी गिम्हवणे येथे संयुक्त कारवाई करत प्रतिबंधित पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा जप्त केला आहे. मानवी आरोग्यास अत्यंत घातक असलेल्या या प्रतिबंधित अन्नपदार्थांची विक्री आणि साठवणूक केल्याप्रकरणी एका दुकानदारावर दापोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
समीर दामोदर महाडिक (वय ५२, रा. गिम्हवणे, ता. दापोली) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपी दुकानदाराचे नाव आहे. याप्रकरणी अन्न व औषध प्रशासनाचे (रत्नागिरी) सहायक आयुक्त संकेत शंकरराव कोणेरी (वय २७) यांनी दापोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, १८ मे रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास गिम्हवणे येथील ‘श्री स्टोअर्स’ जिल्हा परिषद शाळेजवळ ही कारवाई करण्यात आली. आरोपी समीर महाडिक याने आपल्या दुकानात शासनाने प्रतिबंधित केलेल्या वेगवेगळ्या नामांकित कंपन्यांच्या पानमसाला आणि सुगंधित तंबाखूचा साठा विक्रीसाठी ठेवला होता.
या अन्नपदार्थांच्या खरेदीबाबत दुकानदाराकडे चौकशी केली असता, त्याने कोणत्याही प्रकारचा तपशील किंवा बिले सादर केली नाहीत. लोकांच्या आरोग्याशी खेळ खेळून, आरोग्यास अपायकारक असलेल्या या पदार्थांची गुपचूप विक्री केली जात असल्याचे तपासात उघड झाले.
या छाप्यात पोलिसांनी विमल पान मसालाचे एकूण मुद्देमाल पाकीटे, रजनीगंधा आणि आर.एम.डी.पान मसालाचे पाऊचेस, व्ही-१ आणि एम सुगंधित तंबाखू चे पॅकेट्स. एकूण ७,३२२ रुपये किमतीचा प्रतिबंधित मुद्देमाल जप्त केला आहे.
या उत्पादनांच्या प्रतिकूल परिणामांमुळे भावी पिढीच्या जनुकीय संरचनेत देखील फेरबदल होऊ शकतात. हे माहिती असूनही आरोपीने पैशांच्या हव्यासापोटी हा साठा ठेवल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
या प्रकरणी दापोली पोलिसांनी १८ मे रोजी रात्री ८ वाजता गुन्हा रजिस्टर नंबर १०२/२०२६ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. आरोपीविरुद्ध नवीन भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम १२३, २२३, २७४, २७५ सह ‘अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६’ मधील विविध कलमांनुसार कडक कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी दापोली पोलीस पुढील तपास करत आहेत.