अपघात करुन पलायन करणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध गुन्हा
रत्नागिरी ः तालुक्यातील नाणीज-धनगरवाडी रस्त्यावर डंपर व दुचाकीचा अपघातातील पलायन करणाऱ्या डंपर चालकाविरुद्ध ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एमडी अस्लम अब्दूल रहमान (रा. मिर्झापूर, मुजफ्फरपूर, राज्य बिहार) असे संशयित डंपर चालकाचे नाव आहे. ही घटना शनिवारी (ता. २) सायंकाळी साडेतीनच्या सुमारास रत्नागिरी ते नागपूर महामार्गावरील नाणीज धनगरवाडी रस्त्यावर घडली. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार संशयित एमडी रहमान हा डंपर (क्र. एमएच-०८ एपी ५६५१) घेऊन रत्नागिरीहून कोल्हापूरकडे जात होता. नाणीज येथे आल्यानंतर त्याने कोणताही इशारा न देता अचानक डंपर उजव्या बाजूकडे वळविला. त्यामुळे रत्नागिरी ते कोल्हापूरकडे जाणाऱी दुचाकी (क्र. एमएच-४२, बीडी ५५५७) वरिल सुमेध विजयसिंग चौहान (रा. विश्राम बाग, सांगली, मिरज) डंपरला धडक लागून अपघात झाली. या अपघातात सुमेध चौहान जखमी झाला. अपघात घडला हे माहित असतानाही संशयित डंपर चालकाने पलायन केले. या प्रकरणी पोलिस उपनिरीक्षक मोहन कांबळे यांनी ग्रामीण पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरुन पोलिसांनी डंपर चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.