न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडेच्या माजी विद्यार्थी संघाचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न
शाळेच्या प्रगतीसाठी माजी विद्यार्थ्यांनी दिला मदतीचा हात; आठवणींच्या हिंदोळ्यावर रंगली सांज
रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी तालुक्यातील शैक्षणिक व सामाजिक संस्था, सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल, सैतवडे या प्रशालेत शनिवार, दि. २ मे २०२६ रोजी माजी विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा अत्यंत दिमाखात आणि भावपूर्ण वातावरणात पार पडला. सुमारे १०० हून अधिक माजी विद्यार्थ्यांनी या मेळाव्याला उपस्थिती लावून आपल्या शालेय जीवनातील आठवणींना उजाळा दिला.
श्रद्धांजलीने कार्यक्रमाची सुरुवात
सायंकाळी ठीक ४ वाजता मेळाव्याला प्रारंभ झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला शाळेच्या आणि संस्थेच्या उभारणीत योगदान देणाऱ्या, परंतु आज हयात नसलेल्या सर्व दिवंगत थोर व्यक्तींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर शालेय विद्यार्थिनींनी सादर केलेल्या ईशस्तवन आणि स्वागतगीताने वातावरणात प्रसन्नता निर्माण केली.
शाळेच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा संकल्प
माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष श्री. साजिदभाई शेकासन यांनी प्रास्ताविकात माजी विद्यार्थी संघाचे महत्त्व अधोरेखित केले. शाळेच्या उज्ज्वल भविष्यासाठी माजी विद्यार्थ्यांच्या योगदानाची नितांत गरज असल्याचे त्यांनी नमूद केले. ओळख परेड दरम्यान कॅप्टन नईम भोंबल यांनी, “आम्ही याच शाळेच्या संस्कारांमुळे नावारूपाला आलो,” अशा भावना व्यक्त करत शाळेच्या आगामी उपक्रमांत सक्रिय सहभागाचे आवाहन केले.
प्रसिद्ध उद्योजक श्री. सुनील ऊर्फ भाई जाधव यांनी जुन्या आठवणींना उजाळा देत, शाळेसाठी दरवर्षी निधी संकलित करण्याचा प्रस्ताव मांडला. जेणेकरून सैतवडे परिसरातील मुलांना दर्जेदार शिक्षणासाठी शहराकडे जावे लागणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. संस्थेचे अध्यक्ष श्री. सज्जादभाई सय्यद यांनी संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेत सर्वांच्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
विविध क्षेत्रांतील मान्यवरांची उपस्थिती
याप्रसंगी माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष व पत्रकार श्री. उदय महाकाळ यांनी आपल्या लेखणीतून शाळेच्या उपक्रमांना प्रसिद्धी देण्याचे आश्वासन दिले. कोषाध्यक्ष श्री. दीपक भार्गव लिंगायत यांनी शाळेसाठी सर्वतोपरी मदतीची तयारी दर्शविली. मुख्याध्यापिका श्रीम. सिद्धी लांजेकर यांनी शाळेत राबवल्या जाणाऱ्या उपक्रमांची माहिती देऊन माजी विद्यार्थ्यांच्या पुढाकाराचे कौतुक केले. रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक श्री. सलीम मुकादम यांनी मिमिक्री सादर करत मेळाव्यात रंगत आणली.
शुभेच्छांचा वर्षाव
कार्यक्रमात मुसरत काझी-कापडे (मुंबई), नसिरा काझी-माद्रे, रुखसार खान, तस्बीहा पेटकर यांच्यासह अनेक माजी विद्यार्थिनींनी मनोगते व्यक्त केली. तसेच श्री. हनिफ पेटकर, जावेद ठाकूर, डॉ. मयुरेश मोहिते, मुज्जमिल मुल्ला, वसिम खान, ओमकार शिर्के यांसह अनेकांनी शाळेच्या उपक्रमांचे कौतुक केले. माजी मुख्याध्यापक एम.जी. कुलकर्णी, विष्णू कुंभार, संभाजी जाधव सर यांनीही मेळाव्याला शुभेच्छा संदेश पाठवले होते.
या मेळाव्याला संस्थेचे उपाध्यक्ष श्री. अ. अजिज इस्माईल मुकादम, सचिव श्री. समीर सय्यद, खजिनदार वहाबभाई खलपे, लियाकत शेकासन, मुजफ्फर सय्यद यांच्यासह शाळेचा संपूर्ण शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होता. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी रवींद्र लवंदे, फैयाज भाटकर आणि स्वयंपाकी सुवर्णा बैकर व सौ. सय्यद यांनी विशेष परिश्रम घेतले.
शेवटी अध्यक्ष श्री. साजिदभाई शेकासन यांनी आभार प्रदर्शन केले. उपस्थित सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकत्र स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला आणि पुन्हा भेटण्याच्या ओढीने या संस्मरणीय मेळाव्याची सांगता झाली.