परशुराम घाटातील गॅबियन वॉलचे काम रखडले
चिपळूण: मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील अत्यंत महत्त्वाच्या आणि संवेदनशील मानल्या जाणाऱ्या परशुराम घाटातील गॅबियन वॉल उभारणीचे काम १५ एप्रिलपर्यंत पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र, मे महिना सुरू झाला तरी हे काम अद्याप अपूर्णच आहे. सद्यस्थिती पाहता पावसाळ्यापूर्वी हे काम पूर्ण होण्याची शक्यता धूसर असल्याने, यंदाचा पावसाळाही प्रवाशांसाठी आव्हानात्मक ठरण्याची भीती व्यक्त होत आहे.
राष्ट्रीय महामार्ग विभागाने १५ एप्रिलपर्यंत काम पूर्ण करण्याचे आश्वासन दिले होते, परंतु प्रत्यक्षात गॅबियन वॉल अजूनही मुख्य रस्त्यापासून सुमारे १० फूट खाली आहे. ही भिंत पूर्ण झाल्यानंतर त्यात मातीचा भराव टाकणे आणि तो खचू नये म्हणून सिमेंट काँक्रीटचे थर टाकणे ही कामे अद्याप शिल्लक आहेत.
कामाचा हा आवाका पाहता मे महिन्यात हे काम पूर्ण होणे कठीण दिसत आहे. परिणामी, घाटातील धोकादायक वळणांवर अजूनही एकेरी वाहतूक सुरूच आहे. ५.४० किलोमीटर लांबीचा हा घाट चिपळूण आणि खेड अशा दोन टप्प्यांत विभागला आहे. सुरुवातीपासूनच या घाटात दरडी कोसळणे आणि अपघात होण्याचे सत्र सुरू आहे.
केंद्र सरकारने नियुक्त केलेल्या ”टीएचडीसीएल” या संस्थेने सुचवल्यानुसार येथे डोंगराला जाळी बसवणे आणि गॅबियन वॉल उभारण्याचे काम हाती घेण्यात आले होते. मात्र, तांत्रिक बदल आणि नियोजनाचा अभाव यामुळे हे काम वारंवार रखडत आहे. सध्या काम युद्धपातळीवर सुरू असले तरी, निसर्गाच्या लहरीपणापुढे प्रशासनाची ही धावपळ किती यशस्वी ठरते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पावसाळ्याची धास्ती
गतवर्षी मे महिन्यातच मुसळधार पाऊस सुरू झाल्याने अर्धवट असलेल्या गॅबियन वॉल अनेक ठिकाणी कोसळल्या होत्या. त्यामुळे कामाचा बोजवारा उडाला होता. यावर्षीही तीच परिस्थिती ओढवण्याची भीती आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी डिसेंबर २०२५ मध्ये दिल्लीत घेतलेल्या बैठकीत हे काम तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले होते, तरीही कंत्राटदार कंपनीकडून दिरंगाई होत असल्याचे चित्र दिसत आहे.