शासकीय रुग्णालयात चार महिलांवर थायरॉईडची यशस्वी शस्त्रक्रिया
खासगीतील लाखो रुपयांचे उपचार आता मोफत
रत्नागिरी: रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाने आरोग्य सेवेमध्ये एक अत्यंत उल्लेखनीय टप्पा गाठला आहे. रुग्णालयाच्या कान-नाक-घसा विभागाने अत्यंत गुंतागुंतीच्या मानल्या जाणाऱ्या ‘थायरॉईड’ शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण करून चार गरजू महिलांना नवजीवन दिले आहे. विशेष म्हणजे खासगी रुग्णालयांमध्ये या शस्त्रक्रियेसाठी लाखो रुपये खर्च येतो, मात्र येथे हे उपचार पूर्णतः मोफत करण्यात आले आहेत.
या मोहिमेत प्राची गुरव (४२, गणेशगुळे), जानकी गुप्ता (५९, एमआयडीसी), चंदादेवी शहा (४२, कारवांची वाडी) आणि दिपश्री गोताड (४३, जाकादेवी) या चार महिलांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. या महिला गेल्या अनेक महिन्यांपासून गळ्याला सूज येणे, श्वास घेण्यास अडथळा निर्माण होणे आणि अन्न गिळताना त्रास होणे अशा गंभीर समस्यांनी त्रस्त होत्या. तपासणीअंती त्यांच्या थायरॉईड ग्रंथीत मोठ्या गाठी असल्याचे निदान झाले होते.
रुग्णालयातील इएनटी विभाग प्रमुख डॉ. सुनिता बागे यांच्या नेतृत्वाखालील वैद्यकीय पथकाने हे आव्हान स्वीकारले. अत्याधुनिक यंत्रसामग्री आणि तज्ज्ञ डॉक्टरांच्या कौशल्यामुळे या चारही शस्त्रक्रिया कोणत्याही गुंतागुंतीविना पार पडल्या. या प्रक्रियेत भूलतज्ज्ञ डॉ. जमशीर शेख, डॉ. प्रियांका साळुंखे, शस्त्रक्रिया विभाग प्रभारी सुमन कोलापते आणि परिचारिका भावना कुलकर्णी यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
या यशाबद्दल बोलताना अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बागे आणि त्यांच्या संपूर्ण पथकाचे विशेष कौतुक केले. अशा कठीण शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडणे ही रुग्णालयाच्या वाढत्या वैद्यकीय क्षमतेची साक्ष असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच वैद्यकीय अधीक्षक डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाखाली रुग्णांना दर्जेदार सेवा मिळत असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.
दरम्यान, रत्नागिरी जिल्ह्यातच आता अशा मोठ्या आणि खर्चिक शस्त्रक्रिया मोफत उपलब्ध होत असल्याने सर्वसामान्य रुग्णांना मोठा आधार मिळाला आहे. उपचारांनंतर या महिलांची प्रकृती आता सुधारत असून, त्यांच्या कुटुंबीयांनी शासकीय रुग्णालयातील डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
या उल्लेखनीय कार्याबद्दल शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी डॉ. बागे यांचे विशेष कौतुक करत, “अशा कठीण शस्त्रक्रिया शांतपणे व कौशल्याने पार पाडणे ही त्यांच्या उत्कृष्ट वैद्यकीय क्षमतेची साक्ष आहे,” असे गौरवोद्गार काढले. तसेच वैद्यकीय अधीक्षक व स्त्रीरोग तज्ज्ञ डॉ. विनोद सांगवीकर यांच्या मार्गदर्शनाचेही यावेळी कौतुक करण्यात आले.
ग्रामीण व सर्वसामान्य रुग्णांना आपल्या जिल्ह्यातच दर्जेदार व मोफत आरोग्यसेवा उपलब्ध होत असल्याने शासकीय आरोग्य व्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत असून, या यशामुळे रुग्णालयात आनंदाचे आणि अभिमानाचे वातावरण निर्माण झाले आहे अशी माहिती रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. जयप्रकाश रामानंद यांनी दिली.