पर्यटन विकासात ‘सिंधुरत्न’ ठरली मैलाचा दगड
रत्नागिरीतील १३ हजार महिलांना मिळाला हक्काचा रोजगार
रत्नागिरी : जिल्ह्यातील पर्यटन विकासाला गती देण्यासाठी आणि ग्रामीण महिलांना हक्काचा रोजगार उपलब्ध करून देण्यासाठी सिंधुरत्न समृद्ध योजना मैलाचा दगड ठरत आहे. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील विविध महिला प्रभागसंघांना प्रवासी (टुरिस्ट) बस आणि हाऊसबोटचे वाटप करण्यात आले आहे. यातून महिलांनी पर्यटन क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. केवळ वर्षभरात या उपक्रमातून ४८ लाख रुपयांहून अधिक उत्पन्न मिळवण्यात महिलांना यश आले आहे.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या कोकणात पर्यटकांना दर्जेदार सुविधा मिळाव्यात, या उद्देशाने प्रशासनाने महिला प्रभागसंघांना या व्यवसायात उतरवले आहे. यासाठी सुमारे १९९.२४ लाख रुपये खर्च करून सहा टुरिस्ट बस उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली आणि राजापूर यांसारख्या तालुक्यांमधील १२ हजार ९६६ महिला या उपक्रमाशी जोडल्या गेल्या आहेत. या बसच्या माध्यमातून आतापर्यंत ४८ लाख ६१ हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले असून, महिला आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी होत आहेत.
जलपर्यटनातही महिलांनी झेप घेतली आहे. योजनेंतर्गत पाच कोटी रुपयांचा निधी खर्च करून जिल्ह्यात ‘हाऊसबोट’ प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. यामुळे पर्यटकांना कोकणच्या खाडी पर्यटनाचा नवा अनुभव मिळत असून, हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाला आहे.
तालुकानिहाय कामगिरी :
रत्नागिरी तालुक्यातील कोतवडे येथील ‘एकता’ प्रभागसंघाने सर्वाधिक १४.४० लाख रुपयांची कमाई केली आहे, तर वाटद येथील ‘जीवनज्योती’ प्रभागसंघाने ८.२१ लाखांचे उत्पन्न मिळवले. दापोली तालुक्यातील हर्णे येथील ‘संघर्ष’ प्रभागसंघाने ११.१८ लाखांचा टप्पा पार केला आहे. संगमेश्वर व राजापूर: कसबा, पाचल आणि ओणी येथील प्रभागसंघांनीही समाधानकारक उत्पन्न मिळवून व्यवसायात आपला जम बसवला आहे.