सापुचेतळे येथे प्रौढावर प्राणघातक हल्ला
लांजातील तरुणावर गुन्हा दाखल
रत्नागिरी:
रत्नागिरी तालुक्यातील चांदोर येथील एका प्रतिष्ठित आंबा व्यापाऱ्याला फोनवरून शिवीगाळ करत लाकडी दांडक्याने बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात व्यापाऱ्याची सोन्याची चैन आणि चष्म्याचे नुकसान झाले असून, जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. याप्रकरणी रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात लांजा येथील एका तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी रमेश बाबू भोजे (वय ४९, रा. चांदोर) हे आंबा व्यवसायानिमित्त कार्यरत आहेत. शनिवारी (दि. २५) रात्री ९:३० वाजण्याच्या सुमारास आरोपी प्रतीक खरात (रा. सापुचेतळे, ता. लांजा) याने भोजे यांना फोन केला. “माझ्या गाडीच्या ड्रायव्हरला धमकी का दिलीस?” असा जाब विचारत आरोपीने शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. भोजे यांनी आपण कोणालाही धमकी दिली नसल्याचे स्पष्ट केले, तरीही आरोपीकडून त्रास दिला जात होता.
आरोपीला ओळखणाऱ्या व्यक्तींना भेटण्यासाठी भोजे हे आपल्या चारचाकी गाडीने सापुचेतळे येथे गेले. तिथे आरोपी प्रतीक खरात याने त्यांची गाडी अडवून काचेवर जोराने हात मारले. भोजे यांनी गाडी काही अंतरावर नेऊन थांबवली असता, आरोपीने गाडीचा दरवाजा उघडून त्यांना जोराने बाहेर ओढले. त्यानंतर हातातील लाकडी दांडक्याने भोजे यांच्या पाठीवर आणि उजव्या हातावर बेदम मारहाण केली.
नुकसान आणि जीवे मारण्याची धमकी
या झटापटीत रमेश भोजे यांच्या गळ्यातील सोन्याची चैन तुटली असून डोळ्यांवरील चष्म्याचेही नुकसान झाले आहे. मारहाण केल्यानंतर आरोपीने “तुला जिवंत कापून टाकीन” अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेत रमेश भोजे जखमी झाले आहेत.
या प्रकरणी रमेश भोजे यांनी दिलेल्या तक्रारीवरून रत्नागिरी ग्रामीण पोलिसांनी आरोपी प्रतीक खरात याच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ चे कलम ११८(१), ३५२, ३५१(३) आणि ३२४(४) अन्वये गुन्हा (गु.र.नं. २९/२०२६) दाखल केला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.