आंबा घाटात अपघात प्रकरणी मृत चालकावर गुन्हा
संगमेश्वर:
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्ग क्र. १६६ वर मौजे दख्खन गावच्या हद्दीत साखरेची पोती घेऊन जाणारा १४ चाकी ट्रक भीषण अपघाताचा बळी ठरला आहे. या अपघातात ट्रक चालकाचा मृत्यू झाला असून वाहनाचे आणि मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
साखरेची पोती घेऊन जयगडच्या दिशेने प्रवास
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी ट्रक चालक महमद समशेर ताहीर हुसेन अन्सारी (वय ३६, रा. झारखंड) हा आपल्या ताब्यातील १४ चाकी ट्रक (क्र. MH 10 DT 4409) मध्ये फलटण (जि. सातारा) येथून साखरेची पोती भरून जयगड बंदराच्या दिशेने जात होता.
नियंत्रण सुटले आणि ट्रक खोलगट भागात कोसळला
शुक्रवारी पहाटे ५:४५ वाजण्याच्या सुमारास हा ट्रक आंबा घाटातील दख्खन गावाजवळ उतारावर आणि वळणावर आला असता, चालकाचा ट्रकवरील ताबा सुटला. ट्रक अतिवेगात असल्याने महामार्गाचे काम सुरू असलेल्या ठिकाणच्या डिव्हायडरवरून पलीकडे असलेल्या बंद रोड लेनच्या खोलगट भागात जाऊन कोसळला.
हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये ट्रक चालक महमद अन्सारी याला गंभीर दुखापत होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. या अपघातात ट्रकचा चक्काचूर झाला असून साखरेच्या पोत्यांचेही मोठे नुकसान झाले आहे.
याप्रकरणी केतन मुरलीधर जगताप (रा. बारामती) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून संगमेश्वर पोलीस ठाण्यात मृत चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुन्हा नोंद: भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६ (१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये.