परशुराम घाटात एसटी- अर्टिगा कारचा अपघात
बस चालकावर गुन्हा दाखल
चिपळूण:
मुंबई-गोवा महामार्गावरील अतिशय धोकादायक मानल्या जाणाऱ्या परशुराम घाटातील वळणावर एसटी बस आणि कारचा जोरदार अपघात झाला आहे. एका टँकरला ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात एसटी बसने समोरून येणाऱ्या अर्टिगा कारला जोरदार धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथील फिर्यादी सचिन भारत देवकुळे (वय ३४) हे आपली अर्टिगा कार (क्र. MH 14 LX 3143) घेऊन अलोरे येथून पुण्याच्या दिशेने जात होते. शुक्रवारी दुपारी ३:१५ वाजण्याच्या सुमारास त्यांची कार परशुराम घाटातील वळणावर आली असता, समोरून येणाऱ्या एसटी बसने (क्र. MH 14 BT 7593) त्यांना धडक दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, एसटी बस चालक अनिकेत यशवंत पालकर (रा. धनकवडी, पुणे) याने घाटातील वळणावर पुढच्या टँकरला ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला. बसचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस समोरून येणाऱ्या अर्टिगा कारवर जाऊन आदळली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही, मात्र दोन्ही गाड्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
याप्रकरणी सचिन देवकुळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून चिपळूण पोलिसांनी बस चालक अनिकेत पालकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम २८१ आणि मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.