जेवण करताना हृदयविकाराचाझटक्याने वृध्देचा मृत्यू
खेड तालुक्यातील घटना
खेड (प्रतिनिधी):
जेवण करत असताना अचानक छातीत वेदना सुरू झाल्याने एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना खेड तालुक्यातील वडगाववाडी बुद्रुक येथे घडली आहे. सरिता तुकाराम मोरे (वय ६५) असे मृत महिलेचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी २२ एप्रिल रोजी दुपारी ३:३० वाजण्याच्या सुमारास सरिता मोरे या आपल्या राहत्या घरी जेवण करत होत्या. जेवण सुरू असतानाच त्यांच्या छातीत अचानक तीव्र वेदना होऊ लागल्या. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांच्या पतीने तातडीने गावातील रिक्षा बोलावून त्यांना उपचारासाठी आंबोवली येथे नेले.
आंबोवली येथील डॉक्टरांनी त्यांची प्राथमिक तपासणी केली असता, त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याची लक्षणे दिसून आली. डॉक्टरांनी त्यांना तातडीने पुढील उपचारासाठी उपजिल्हा रुग्णालय, कळंबणी (खेड) येथे नेण्याचा सल्ला दिला. नातेवाईकांनी त्यांना तातडीने कळंबणी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करूनही रात्री ८:२० वाजण्याच्या सुमारास त्यांना मृत घोषित करण्यात आले.
या प्रकरणी मयत सरिता मोरे यांचा भाचा ऋतिक राजेश साळवी यांनी दिलेल्या खबरीवरून, खेड पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यू (B.N.S.S १९४ प्रमाणे) नोंद करण्यात आली आहे.