जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांची आज वज्रमुठ
शेतकरी नेते राजू शेट्टी करणार मार्गदर्शन, ठरणार पुढील लढ्याची दिक्षा
रत्नागिरी :
आंबा, काजूसाठी शासनाने जाहीर केलेली नुकसान भरपाई अल्प असून, हेक्टरी पाच लाखाची नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी असून यासाठी जिल्ह्यातील आंबा व काजू उत्पादकांचा एल्गार मेळावा शनिवारी रत्नागिरीत होत आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून, सर्व राजकीय पक्षांचे झेंडे बाजूला ठेवत शेतकऱ्यांनी न्याय मिळवण्यासाठी एकत्र यावे असे आवाहन माजी आमदार बाळ माने यांनी केले आहे.
रत्नागिरीतील नाचणे येथील बालाजी मंगल कार्यालयात या मेळाव्याचे आयोजन शनिवारी सकाळी 10 ते 1 या कालावधीत करण्यात आले आहे. शेतकरी नेते राजू शेट्टी या मेळाव्याला मार्गदर्शन करणार असून, आंबा व काजू उत्पादकांच्या पुढील लढ्याची दिक्षा यावेळी ठरणार आहे. या सभेला माजी खासदार विनायक राऊत प्रामुख्याने उपस्थित राहणार असल्याचे आयोजक बाळ माने यांनी सांगितले.
गेल्या काही काळापासून कोकणात निकृष्ट दर्जाची खते आणि औषधांमुळे बागायतदारांचे प्रचंड नुकसान झाले आहे. त्यातच निसर्गाची अवकृपा, अनियमित पाऊस आणि वाढत्या तापमानामुळे यंदा केवळ 20 टक्के उत्पादन हाती आले आहे. कोकणात सुमारे 1.5 कोटी आंबा आणि 3 कोटी काजूची झाडे असूनही नवीन लागवड थंडावली आहे. 50 वर्षांच्या इतिहासात आंबा उत्पादक शेतकरी इतका हवालदिल कधीच झाला नव्हता, अशी भावना माजी आमदार बाळ माने यांनी व्यक्त केली.
या पत्रकार परिषदेला माने यांच्यासमवेत कोकण हापूस आंबा उत्पादक सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष प्रकाश (बावा) साळवी, उबाठा शिवसेना युवासेना जिल्हा प्रमुख प्रसाद सावंत, विभागप्रमुख मयुरेश पाटील, विजय देसाई हे देखील उपस्थित होते. हे आंदोलन कोणत्याही सरकार किंवा व्यक्तीच्या विरोधात नसून, येथील शेतकऱ्यांच्या अस्तित्वासाठी आहे. त्यामुळे सर्व पक्षांच्या कार्यकर्त्यांनी आणि शेतकऱ्यांनी राजकीय जोडे बाहेर ठेवून या चळवळीत सहभागी व्हावे असे आवाहन बाळ माने यांनी केले आहे. या सभेसाठी जिल्ह्यातील सर्व आंबा, काजू उत्पादक आणि मच्छीमार बांधवांना मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.