कुसुमताई पतसंस्थेची झेप कायम; ७२ लाखांचा निव्वळ नफा
९८% वसुलीची प्रभावी कामगिरी
रत्नागिरी :
कुसुमताई सहकारी पतसंस्थेने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात दमदार आर्थिक कामगिरी नोंदवत प्रगतीची घोडदौड कायम ठेवली आहे. संस्थेला यावर्षी तब्बल ७२ लाख २३ हजार रुपयांचा निव्वळ नफा झाला असल्याची माहिती अध्यक्ष सतिश शेवडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
संस्थेची आर्थिक स्थिती भक्कम असून सभासदांचा विश्वास आणि कर्मचाऱ्यांचे परिश्रम यामुळेच हे यश साध्य झाल्याचे त्यांनी नमूद केले. सरत्या वर्षात संस्थेकडे ४७ कोटी ०४ लाख रुपयांच्या ठेवी जमा झाल्या, तर ४० कोटी २३ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. संस्थेचे भागभांडवल ७७ लाख ३५ हजार रुपयांवर पोहोचले आहे.
विशेष म्हणजे, यंदा वसुलीचे प्रमाण अत्यंत समाधानकारक राहून ९८ टक्के वसुली करण्यात यश आले आहे. उर्वरित थकबाकीदारांवर ‘कलम १०१’ अंतर्गत कारवाई करून १०० टक्के वसुलीचे उद्दिष्ट संस्थेने ठेवले आहे.
भविष्यातील योजनांबाबत माहिती देताना शेवडे यांनी सांगितले की, पावस येथील शाखा लवकरच स्वमालकीच्या नव्या जागेत स्थलांतरित करण्यात येणार आहे. मुख्य बाजारपेठेत सुसज्ज कार्यालय उभारले जात असून ते लवकरच सभासदांच्या सेवेत दाखल होईल.
संस्था केवळ आर्थिक व्यवहारापुरती मर्यादित न राहता सामाजिक बांधिलकी जपण्यावरही भर देत असून, नफ्याचा काही हिस्सा सामाजिक कार्यासाठी वापरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच, सभासदांच्या मागणीनुसार लवकरच ‘गृहकर्ज’ योजना सुरू करण्याचा सकारात्मक विचार सुरू असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
सभासद, ठेवीदार आणि हितचिंतकांनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल कृतज्ञता व्यक्त करत भविष्यात अधिक दर्जेदार सेवा देण्याचा प्रयत्न सुरू राहील, अशी ग्वाही शेवडे यांनी दिली.