गावखडीत ८९७ कासवांच्या पिल्लांची समुद्रात यशस्वी झेप
तीन महिन्यात ७८ घरटी संरक्षित; ८ हजार ४०६ अंड्यांचे संवर्धन
रत्नागिरीः ऑलिव्ह रिडले कासवाच्या मादीला अंडी घालण्यासाठी गावखडी (ता. रत्नागिरी) समुद्रकिनारा सुरक्षित आहे. त्यामुळे गेल्या तीन महिन्यात येथे ७८ घरटी संरक्षित केली असून, ८ हजार ४०६ अंड्यांचे संवर्धन केले आहे. आत्तापर्यंत ८९७ कासवांची पिल्ले समुद्रात झेपावली आहेत.
गावखडी किनाऱ्यावर अनेक वर्षे ऑलिव्ह रिडले कासवं अंडी घालण्यास येत आहेत. कासवमित्र आणि वनविभाग यांच्यावतीने या किनाऱ्यावर कासव संवर्धन केंद्र निर्माण केले आहे. त्या माध्यमातून समुद्रकिनारी आढळणारी कासवांची घरटी योग्य ठिकाणी संरक्षित केली जातात. संरक्षित केलेल्या अंड्यांतून पिल्ले बाहेर आल्यानंतर त्यांना पुन्हा समुद्रामध्ये सोडण्यात येते. या किनाऱ्यावरती दरवर्षी मोठ्या प्रमाणात घरटी तयार होत आहेत. साधारणपणे जानेवारी ते मे या कालावधीत कासवे अंडी घालण्यासाठी येण्यास आरंभ होतो. यावर्षी ८ जानेवारीला पहिले घरटे तयार झाले. त्यानंतर ३० मार्चपर्यंत ७८ घरटी तयार झाली असून, त्यात ८ हजार ४०६ अंड्यांचे संवर्धन केले आहे. या अंड्यांतून ४५ ते ५० दिवसांनी पिल्ले बाहेर पडतात.
हा उपक्रम विभागीय वनाधिकारी कांदळवन कांचन पवार, सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका पाटील, वनक्षेत्रपाल किरण ठाकूर, वनपरिमंडळ अधिकारी मिलिंद डाफळे, वनरक्षक अमोल बिराडे, कासवमित्र प्रदीप डिंगणकर, विकास आंबेरकर, विनोद सुर्वे हे या समुद्रकिनाऱ्यावर कासव संवर्धनाचे काम करत आहेत.
दरम्यान, सायंकाळी अनेक पर्यटक कासव संवर्धन केंद्राला आवर्जून भेट देत आहेत. कासवाची पिल्ले समुद्रात झेपवतानाचे दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक आवर्जून उपस्थित राहतात. त्यामुळे पर्यटनालाही चालना मिळत आहे.
चौकट
मालगुंडमध्येही संवर्धन
रत्नागिरी तालुक्यातील मालगुंड समुद्रकिनारीही ६४ कासवाची पिल्ले समुद्रात सोडण्यात आली. आतापर्यंत येथून ७११ पिल्ले सोडण्यात आली आहेत. येथील संवर्धनाच्या कामासाठी आदर्श मयेकर हे काम करतात. कासवांची अंडी शोधणे, ती सुरक्षित आणून जतन करणे, समुद्रात सोडणे, ही कामे आदर्श मयेकर करतात.
कोट
कासवांच्या अंड्यांमधून बाहेर पडणारी पिल्ले पाहण्याचा आनंद कुठे मिळत नाही. गावखडी किनारा सागरी महामार्गालगत असल्यामुळे आमच्यासारखे पर्यटक या किनाऱ्याकडे सायंकाळी येत असतात. किनारा जवळ असल्याने हे दृश्य पाहायला मिळत आहे.
- अनिल कासार, कोल्हापूर