नगरसेविका वर्षा ढेकणे व दादा ढेकणे यांचा स्तुत्य उपक्रम; ६ रुग्णांचे स्वीकारले पालकत्व
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त मदतीचा हात
रत्नागिरी: ‘क्षयरोगमुक्त भारत’ ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना साकार करण्यासाठी लोकसहभाग महत्त्वाचा असल्याचे प्रतिपादन करत, जागतिक क्षयरोग दिनानिमित्त भारतीय जनता पार्टी महिला मोर्चा जिल्हाध्यक्षा तथा नगरसेविका सौ. वर्षा परशुराम ढेकणे आणि शहराध्यक्ष दादा ढेकणे यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळ वाटप व मदतीचा हात देण्यात आला.
२४ मार्च रोजी जागतिक क्षयरोग दिनाचे औचित्य साधून ढेकणे दांपत्याने जिल्हा क्षयरोग विभागात जाऊन उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. यावेळी रुग्णांना फळांचे वाटप करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करण्यात आली. केवळ औषधोपचारच नव्हे, तर रुग्णांना मिळणारा मानसिक आधार त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी अत्यंत आवश्यक असल्याचे यावेळी नमूद करण्यात आले.
या उपक्रमाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे सौ. वर्षा ढेकणे यांनी सामाजिक बांधिलकी जपत सहा क्षयरोग रुग्णांचे पुढील सहा महिन्यांसाठी पालकत्व स्वीकारले. या कालावधीत संबंधित रुग्णांना आवश्यक असणारा सकस आहार आणि पोषण देण्याची संपूर्ण जबाबदारी त्यांनी उचलली आहे. यामुळे आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या रुग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे.
यावेळी आरोग्य विभागातील डॉ. जगताप (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ. गावडे (जिल्हा क्षयरोग अधिकारी), डॉ. वाघमारे व डॉ. कांबळे (वैद्यकीय अधिकारी), मेट्रो मॅडम शिरधनकर, बापट, विकास पावसकर, क्षयरोग विभागाचे कर्मचारी आणि बबलू विलनकर (भाजपा बूथ अध्यक्ष) व पदाधिकारी उपस्थित होते.
”आपला एक मदतीचा हात समाजासाठी खूप उपयोगाचा असतो. टीबी मुक्त भारतासाठी समाजाने एकत्र येऊन अशा रुग्णांना आधार देणे गरजेचे आहे.”
— सौ. वर्षा परशुराम ढेकणे (नगरसेविका, प्रभाग क्र. १५)