दाभोळचा समुद्रकिनारा ठरतोय कासवांचा सुरक्षित ‘अधिवास
९०० हून अधिक पिल्लांचा समुद्राकडे प्रवास!
रत्नागिरी: जिल्ह्यातील दाभोळ बीचवर यंदा कासव संवर्धनाच्या उपक्रमाला उल्लेखनीय यश मिळाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. अनुकूल वातावरण, स्वच्छ आणि सुरक्षित समुद्रकिनारा तसेच स्थानिक नागरिकांच्या सक्रिय सहकार्यामुळे या परिसरात कासवांची संख्या वाढताना दिसत असून दाभोळ बीच हा कासवांसाठी पोषक आणि सुरक्षित अधिवास ठरत आहे.
यावर्षी दाभोळ बीचवर आढळलेल्या कासवांच्या घरट्यांचे अत्यंत काळजीपूर्वक संरक्षण करण्यात आले. या अंतर्गत एकूण ९ घरट्यांमधून तब्बल ४०९ कासवांची पिल्ले नैसर्गिकरित्या बाहेर पडून समुद्राच्या दिशेने झेपावली. तसेच उर्वरित ५ घरट्यांमधील ४९७ पिल्लांना सुरक्षितपणे समुद्रात सोडण्यात आले. या संपूर्ण प्रक्रियेदरम्यान स्थानिक ग्रामस्थ, स्वयंसेवक आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घेतली.
कासवांची अंडी सुरक्षित राहावीत यासाठी घरट्यांभोवती संरक्षक जाळी उभारण्यात आली होती. पिल्ले बाहेर पडण्याची वेळ जवळ आल्यानंतर त्यांना कोणताही धोका निर्माण होऊ नये यासाठी योग्य नियोजन करून त्यांना सुरक्षितरित्या समुद्रापर्यंत पोहोचविण्यात आले. या उपक्रमामुळे मोठ्या प्रमाणात कासवांच्या पिल्लांचे रक्षण होऊन त्यांना नवजीवन मिळाले आहे.
या यशस्वी संवर्धन मोहिमेमुळे पर्यावरण संवर्धनाबाबत जागरूकता वाढत असून स्थानिक नागरिकांकडूनही सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. भविष्यातही अशाच पद्धतीने सातत्याने प्रयत्न केल्यास कासवांच्या संख्येत आणखी वाढ होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.