रत्नागिरीत गॅस वितरणावरून व्यवस्थापन – कर्मचारी आमने सामने
कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन, वाद पोहोचला पोलीस ठाण्यात
रत्नागिरी
रत्नागिरी शहरात व्यावसायिक गॅस सिलिंडरच्या वितरणावरून गॅस एजन्सीचे व्यवस्थापन आणि कर्मचारी यांच्यात मोठा वाद उफाळून आला.या वादाचे पडसाद थेट पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचला आहे. व्यवस्थापनाने केलेल्या तक्रारीच्या निषेधार्थ रत्नागिरी गॅस एजन्सीच्या १४ कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळपासून ‘काम बंद’ आंदोलन पुकारले. आधीच गॅस टंचाई त्यात कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन पुकारल्याने ग्राहकांची मोठी गैरसोय झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी व्यावसायिक गॅस सिलिंडरचे वितरण करताना ५ सिलिंडर चुकीच्या पद्धतीने वितरित केल्याचा आरोप कंपनी व्यवस्थापनाने केला आहे. इतकेच नव्हे तर, गोडाऊन कीपरने या पाच सिलिंडरची अवैध पद्धतीने विक्री केल्याचा दावाही एजन्सीकडून करण्यात आला आहे. याप्रकरणी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांकडे रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली.
दुसरीकडे,कर्मचाऱ्यांनी व्यवस्थापनाचे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. “आम्ही पावतीनुसारच सर्व सिलिंडरचे कायदेशीर वितरण केले आहे,असे म्हणत कर्मचारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. व्यवस्थापनाच्या या अन्यायकारक आरोपांमुळे संतप्त झालेल्या १४ कर्मचाऱ्यांनी मंगळवारी सकाळी ८.३० वाजल्यापासून आपले काम थांबवण्याचा निर्णय घेतला.
गॅस वितरण कंपनीतील कर्मचारी पोलीस ठाण्याच्या बाहेर जमा झाले असून, जोपर्यंत तोडगा निघत नाही तोपर्यंत काम सुरू न करण्याचा पवित्रा त्यांनी घेतला आहे. या वादामुळे शहरातील व्यावसायिक गॅस वितरणावर परिणाम होण्याची शक्यता आहे.