घरगुती गॅस दरवाढीचा सर्वसामान्यांना फटका; जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
रत्नागिरी जिल्हा काँग्रेस आक्रमक
रत्नागिरी:
केंद्रातील मोदी सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या किमतीत ६० रुपयांची मोठी वाढ केल्याने सर्वसामान्यांचे आर्थिक बजेट कोलमडले आहे. या दरवाढीचा तीव्र निषेध व्यक्त करत आज रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. आखाती देशांतील युद्धाचे कारण पुढे करून केंद्र सरकार सामान्य जनतेची लूट करत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेसने केला.
निवेदनात नमूद केल्यानुसार, केंद्र सरकारने केवळ घरगुती गॅसचे दर वाढवले नाहीत, तर कमर्शियल गॅस सिलिंडरच्या पुरवठ्यावरही मर्यादा आणल्या आहेत. याचा थेट परिणाम हॉटेल व्यावसायिक, खानावळी, रेल्वे कॅन्टीन, हॉस्पिटल आणि महाविद्यालयांच्या कॅन्टीनवर झाला आहे. गॅस तुटवड्यामुळे आणि वाढीव दरामुळे अनेक छोटे-मोठे व्यावसायिक आर्थिक संकटात सापडले असून, त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.
यावेळी काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्या कार्यकाळाची आठवण करून दिली. “यूपीए सरकारच्या काळात आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमती गगनाला भिडलेल्या असतानाही, तत्कालीन सरकारने त्याचा भार सर्वसामान्य नागरिकांवर पडू दिला नव्हता. मात्र, विद्यमान एनडीए सरकार आंतरराष्ट्रीय परिस्थितीचे भांडवल करून जनतेची आर्थिक कोंडी करत आहे,” अशी टीका यावेळी करण्यात आली. ६० रुपयांची ही वाढ सर्वसामान्य कुटुंबांचे कंबरडे मोडणारी असून सरकारने हा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयात हे निवेदन देताना काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष नुरुद्दीन सय्यद, शहर अध्यक्ष अशपाक काद्री, लांजा तालुकाध्यक्ष राजेश राणे यांच्यासह कौशल फाळके, नंदन गांगण, पांडू काका कवितके, अशोक जाधव, अल्ताफ ठाकूर, जैनुल सारंग आणि इरफान होडेकर यांसारखे अनेक प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सरकारने या दरवाढीवर वेळीच नियंत्रण मिळवले नाही, तर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी जिल्हा काँग्रेस कमिटीने दिला आहे