कुत्रा आडवा आल्याने कार घुसली थेट अंगणात
पाचल : (वार्ताहर)
मुंबई-गोवा महामार्गावरील राजापूर तालुक्यातील वाटुळ तिठा येथे गुरुवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास एका कारचा भीषण अपघात झाला. रस्त्यावर अचानक कुत्रा आडवा आल्याने चालकाचा ताबा सुटला आणि कार थेट रस्त्याशेजारील घराच्या अंगणात घुसली. सुदैवाने, या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मिळालेल्या माहितीनुसार,श्री. शामकांत पाटणे हे आपल्या पत्नीसह व्हॅगनार कारने MH-05-DH-0392 चिपळूणहून गोव्याच्या दिशेने जात होते. सकाळी सातच्या सुमारास त्यांची गाडी वाटुळ तिठ्यातील उतारावर आली असताना, भांबेडकडून अचानक एक कुत्रा गाडीसमोर धावत आला.
कुत्र्याला वाचवण्याच्या प्रयत्नात पाटणे यांचा गाडीवरील ताबा सुटला. अनियंत्रित झालेली कार रस्त्यावरून खाली उतरून थेट स्थानिक रहिवासी श्री.सावंत यांच्या घराच्या अंगणात जाऊन धडकली.
या अपघाताचा आवाज ऐकताच परिसरातील नागरिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. गाडीत अडकलेल्या पाटणे पती-पत्नीला स्थानिकांनी सुरक्षितपणे बाहेर काढले.या अपघातात:शामकांत पाटणे व त्यांच्या पत्नीला किरकोळ दुखापत झाली आहे.कारचे काही प्रमाणात नुकसान झाले आहे.
मोठा अनर्थ टळल्याने सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी परिस्थितीची पाहणी केली. भरधाव वेगावर नियंत्रण आणि वन्यप्राण्यांचा वावर यामुळे महामार्गावर अशा घटना घडत असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे.