गॅस तुडवड्यामुळे हॉटेल व्यावसायिकांनी स्विकारला चुलीचा पर्याय
रत्नागिरीः
सध्याच्या जागतिक युद्धजन्य परिस्थितीचा मोठा फटका थेट रत्नागिरीतील हॉटेल व्यवसायाला बसू लागला आहे. सरकारने व्यावसायिक गॅस सिलिंडरचा पुरवठा मर्यादित केल्याने शहरात गॅसची तीव्र टंचाई निर्माण झाली आहे. मात्र, या संकटावर मात करण्यासाठी रत्नागिरीतील अनेक हॉटेल व्यावसायिकांनी चुलीचा पर्याय स्विकारला आहे. चूल मांडून आपला व्यवसाय सुरू ठेवण्याचा निर्णय अनेक हॉटेल व्यावसायिकांनी घेतला आहे.
जगातील विविध देशांत सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीमुळे इंधन पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. याचाच परिणाम म्हणून व्यावसायिक गॅस सिलिंडरचा साठा संपत चालला आहे. अशा परिस्थितीत हॉटेल बंद ठेवण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. रत्नागिरीतील हर्षा टेरेस गार्डन, हॉटेल मराठा आणि सी फॅन्स या तीनही हॉटेलचे संचालक सुहास ठाकूरदेसाई यांनी ही समस्या गांभीर्याने घेतली.
कोकणात येणाऱ्या पर्यटकांची गैरसोय होऊ नये आणि
आपला व्यवसाय सुरू राहावा, या उद्देशाने ठाकूरदेसाई यांनी ‘हर्षा टेरेस गार्डन’च्या टेरेसवरच चुली मांडल्या आहेत. आता या चुलींवरच अन्नपदार्थ शिजवले जाणार आहेत. गॅसची कमतरता असल्याने आणि चुलीवर स्वयंपाक करण्यास लागणारा वेळ लक्षात घेता, हॉटेलमध्ये सध्या जेवणाचे मोजकेच ४ प्रमुख मेन्यू ठेवण्यात आले आहेत.
या कल्पक प्रयोगाबद्दल बोलताना सुहास ठाकूरदेसाई म्हणाले की, “जर आम्ही हातावर हात धरून बसलो असतो, तर हॉटेल्स बंद करण्याची वेळ आली असती. रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना जेवणासाठी भटकंती करावी लागली असती. म्हणूनच या युद्धजन्य परिस्थितीतही आम्ही हा पर्याय निवडला आहे. चुलीवरच्या जेवणाची चव वेगळीच असते, त्यामुळे पर्यटकांना हे जेवण अधिक आवडेल अशी आम्हाला आशा आहे.”
आधुनिक युगात गॅस आणि ओव्हनवर चालणारी हॉटेल्स आता पुन्हा एकदा आपल्या पारंपरिक मुळांकडे वळताना दिसत आहेत. रत्नागिरीतील या हॉटेल चालकाची ही धडपड सध्या शहरभर चर्चेचा विषय ठरत आहे. गॅस टंचाईच्या काळातही हार न मानता काढलेला हा मार्ग इतर व्यावसायिकांसाठीही प्रेरणादायी ठरत आहे.