बीएसएनएलऑफिस परिसरातून पाणी मीटर चोरणारा चोरटा गजाआड
गुन्हे प्रकटीकरण पथकाची धडक कारवाई
रत्नागिरी:-
रत्नागिरी शहरात गेल्या काही दिवसांपासून पाणी मीटर चोरीच्या वाढत्या तक्रारींची दखल घेत, शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने एका सराईत चोरट्याला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून बीएसएनएल ऑफिस परिसरातून चोरलेले तीन पाणी मीटर हस्तगत करण्यात आले असून, त्याने एका घरफोडीच्या गुन्ह्याचीही कबुली दिली आहे.
शहरातील बीएसएनएल ऑफिस परिसरातून २४ व २५ फेब्रुवारी २०२६ रोजी तीन पाणी मीटर चोरीला गेल्याप्रकरणी ६ मार्च रोजी शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. याव्यतिरिक्त शहरातील इतर भागांतूनही मीटर चोरीच्या अनेक तक्रारी पोलिसांकडे प्राप्त झाल्या होत्या. या प्रकरणी पोलीस अधीक्षक नितीन बगाटे, अप्पर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी आणि डीवायएसपी निलेश माईनकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांनी तपास पथकाला सूचना दिल्या होत्या. त्यानुसार, पीएसआय सागर शिंदे आणि त्यांच्या पथकाने सीसीटीव्ही फुटेज आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने साहिल संजय जाधव (वय २५, रा. फगर वठार, रत्नागिरी) याला ताब्यात घेतले.
पोलिसी खाक्या दाखवताच साहिल जाधव याने बीएसएनएल ऑफिसमधील ३ मीटर चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी ९ हजार रुपये किमतीचे हे मीटर हस्तगत केले आहेत. अधिक चौकशी केली असता, आरोपीने शहर पोलीस ठाण्यात नोंद असलेल्या एका जुन्या घरफोडीच्या गुन्ह्याची देखील कबुली दिली आहे. या घरफोडीतील मुद्देमाल हस्तगत करण्याची प्रक्रिया आता पोलिसांनी सुरू केली आहे.
ही महत्त्वाची कारवाई रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विवेक पाटील यांच्या नेतृत्वाखाली
सपोफौ दीपक साळवी, पोहेकॉ अमोल भोसले, आशिष भालेकर, पंकज पडेलकर, भालचंद्र मयेकर, पोकों अमित पालवे यांनी केली. शहरातील इतर भागांतील मीटर चोरीच्या प्रकरणांतही या आरोपीचा हात असण्याची शक्यता असून पोलीस त्या दिशेने तपास करत आहेत.