राजापूर कवसवली येथे अवैध दारूसाठा जप्त
सवरे दांपत्यावर पोलिसांची कारवाई
राजापूर (प्रतिनिधी):
राजापूर तालुक्यातील कवसवली वाणावाडी येथे राहत्या घरात बेकायदेशीररीत्या विक्रीसाठी साठवून ठेवलेला गोवा बनावटीच्या आणि देशी दारूचा साठा राजापूर पोलिसांनी छापा टाकून जप्त केला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोघांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून एकूण १३ हजार १०५ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, ७ मार्च रोजी रात्री ८ वाजेच्या सुमारास राजापूर पोलीस ठाण्याचे पोलीस शिपाई प्रथमेश रवींद्र उकार्ड (वय ३५) व त्यांच्या पथकाने कवसवली वाणावाडी येथील एका घरावर छापा टाकला. यावेळी घराच्या मालकी हक्काच्या जागेत विनापरवाना दारूची विक्री करण्याच्या उद्देशाने साठा करून ठेवल्याचे आढळून आले.
याप्रकरणी सुनील उर्फ बबन केशव सवरे (वय ४४) आणि स्नेहल सुनील सवरे (वय ४०, दोघेही रा. कवसवली वाणावाडी, ता. राजापूर) यांच्यावर महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५ (ई) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ७ मार्च रोजी रात्री ११ वाजता या गुन्ह्याची नोंद करण्यात आली.
पोलिसांनी केलेल्या कारवाईत विविध कंपन्यांच्या दारूच्या बाटल्यांचे एकूण ८ बॉक्स जप्त केले आहेत. असा एकूण १३ हजार १०५ रुपयांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. या घटनेचा अधिक तपास राजापूर पोलीस करत आहेत.