कारची दोन दुचाकींना धडक; लहान मुलींसह ५ जण जखमी
जेलरोड येथील घटना; कार चालकावर गुन्हा दाखल
रत्नागिरी (प्रतिनिधी):
रत्नागिरी शहरातील जेलरोड परिसरात मंगळवारी रात्री एका भरधाव कारने दोन दुचाकींना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात दोन लहान मुलींसह एकूण पाच जण जखमी झाले आहेत. हा अपघात ३ मार्च रोजी रात्री ९ वाजण्याच्या सुमारास आठवडा बाजार ते मारुती मंदिर जाणाऱ्या रस्त्यावर घडला.
मिळालेली माहिती अशी की, फिर्यादी अनिल सिंग विक्रमसिंग (वय २३, रा. शांतीनगर, मूळ- राजस्थान) हे आपल्या टीव्हीएस रायडर मोटारसायकलवरून (क्रमांक RJ-44-SF-9967) मित्र ओमप्रकाश मेघवाल याच्यासह मारुती मंदिरच्या दिशेने जात होते. ते जेलनाका परिसरात आले असता, पाठीमागून येणाऱ्या एका भरधाव कारने त्यांच्या दुचाकीला जोराची धडक दिली.
ही धडक इतकी भीषण होती की, फिर्यादी यांची दुचाकी समोरून जाणाऱ्या दुसऱ्या एका मोटारसायकलवर जाऊन आदळली. त्या दुसऱ्या दुचाकीवरून बिल्कीस नदीम दलाल (वय ३५, रा. राजीवडा) या आपल्या दोन लहान मुलींसह जात होत्या. या धडकेमुळे दोन्ही दुचाकींवरील पाचही जण रस्त्यावर फेकले गेले आणि जखमी झाले.
स्थानिकांनी मदतीसाठी धाव घेतली
अपघात घडताच परिसरातील नागरिकांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. जखमींना रिक्षातून तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात (सिव्हील हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले. तेथे त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.
या प्रकरणी पोलिसांनी कार चालक सिद्धराज गजानन मयेकर (वय २७, रा. शिरगाव मयेकरवाडी) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. कार अतिवेगाने आणि निष्काळजीपणे चालवून अपघातास कारणीभूत ठरल्याप्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ नुसार रत्नागिरी शहर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.