कशेडी बोगद्याजवळ भीषण अपघात
भरधाव कार भिंतीवर आदळल्याने ओवळीतील तरुणाचा मृत्यू
खेड (प्रतिनिधी):
मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी बोगद्याजवळ सोमवारी दुपारी ४:४५ वाजण्याच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या मारुती स्विफ्ट कारने रस्त्याच्या संरक्षक भिंतीला जोरदार धडक दिली. या अपघातात ओवळी (ता. चिपळूण) येथील २९ वर्षीय तरुणाचा जागीच मृत्यू झाला असून, चालक गंभीर जखमी झाला आहे.
मिरा भाईंदर येथून चिपळूणच्या दिशेने येत असलेली मारुती स्विफ्ट कार (क्र. एम.एच. ०४ जे.एम. ०३०१) कशेडी बोगदा ओलांडून खेडच्या दिशेने जात होती. बोगद्यापासून सुमारे ५० मीटर अंतरावर आल्यावर, चालक शिवम हरेंद्र सिंग याने गाडीवरील ताबा गमावला. रस्त्याच्या परिस्थितीचा अंदाज न घेता अतिवेगात आणि निष्काळजीपणे गाडी चालवल्याने ती महामार्गाच्या कडेला असलेल्या संरक्षक भिंतीवर जाऊन आदळली.
या भीषण अपघातात कारमध्ये बसलेले फिर्यादी कुणाल शिंदे यांचे चुलत भाऊ दिक्षय विनोद शिंदे (वय २९, मूळ रा. ओवळी, ता. चिपळूण, सध्या रा. मिरा भाईंदर) यांचा गंभीर दुखापत झाल्याने मृत्यू झाला. अपघातात कारचा चालक शिवम हरेंद्र सिंग हा स्वतः देखील जखमी झाला असून कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे.
याप्रकरणी मृताचा भाऊ कुणाल रविकांत शिंदे यांनी खेड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलिसांनी ३ मार्च २०२६ रोजी मध्यरात्री १२:३१ वाजता चालक शिवम हरेंद्र सिंग याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम १०६(१), २८१, १२५(अ), १२५(ब) आणि मोटार वाहन कायद्याच्या कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
कशेडी बोगद्याच्या परिसरातील अतिवेगामुळे एका तरुण जीवाचा बळी गेल्याने ओवळी परिसरात शोककळा पसरली आहे. खेड पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.