वडवली बौद्धवाडी येथे बौद्धविहारात चोरी
अज्ञात चोरट्यांनी लंपास केली सुमारे ९ हजारांची पितळी व तांब्याची भांडी
राजापूर:
तालुक्यातील वडवली बौद्धवाडी येथील सार्वजनिक बौद्धविहाराच्या दरवाजाचा कोयंडा तोडून अज्ञात चोरट्यांनी सुमारे ८,८८० रुपये किमतीची तांबा, पितळ आणि स्टीलची भांडी चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी राजापूर पोलीस ठाण्यात अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी गौतम विश्राम जाधव (वय ४५, रा. मिरजोळे-रत्नागिरी) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २८ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता बौद्धविहाराची साफसफाई करून पितळ आणि स्टीलची भांडी व्यवस्थित ठेवून विहाराला कुलूप लावण्यात आले होते. मात्र, २ मार्च २०२६ रोजी रात्री ८ च्या सुमारास जेव्हा फिर्यादी आणि मंडळाचे सदस्य पुन्हा साफसफाईसाठी गेले, तेव्हा त्यांना विहाराच्या दरवाजाचा कोयंडा तुटलेला दिसला. आत प्रवेश केल्यानंतर मंडळाच्या मालकीची जुनी वापरती भांडी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. चोरट्याने लबाडीच्या इराद्याने विहारात प्रवेश करून साहित्याची चोरी केली आहे.
चोरट्यांनी एकूण ८,८८० रुपयांचा माल लंपास केला असून त्यात पितळेची पाण्याची टाकी, तांब्याचे पातेले, मोठे तांब्याचे पातेले, स्टीलची भांडी या वस्तूंचा समावेश आहे:
या घटनेबाबत ३ मार्च २०२६ रोजी पहाटे ३ वाजता राजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ४५/२०२६ नुसार भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ३३१(३), ३३१(४) आणि ३०५(अ) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत असून अज्ञात चोरट्याचा शोध घेत आहेत. बौद्धविहारासारख्या धार्मिक स्थळी झालेल्या या चोरीमुळे परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.