आर्थिक विकास होताना पर्यावरण संरक्षण महत्त्वाचे
डॉ. केतन चौधरी यांचे प्रतिपादन
रत्नागिरी:
“देश आज झपाट्याने आर्थिक प्रगतीकडे वाटचाल करत आहे. मात्र, ही प्रगती साधत असताना पर्यावरणाचे रक्षण करणे ही काळाची गरज आहे. समृद्ध पर्यावरण आणि आनंदी जनता हे केवळ शाश्वत विकासाच्या माध्यमातूनच साध्य होऊ शकते,” असे प्रतिपादन सागरी जीव शास्त्रीय संशोधन केंद्राचे वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी तथा मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनचे प्राचार्य डॉ. केतन चौधरी यांनी केले.
स्थानिक महाविद्यालयात ‘विज्ञान दिनानिमित्त’ आयोजित कार्यक्रमात ते प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. स्मिता सुरवसे, सायन्स असोसिएशनचे समन्वयक प्रा. रॉड्रिग्ज, डॉ. एम. एन. जांभळे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यापीठ स्तरीय ‘अविष्कार’ स्पर्धेसाठी निवड झालेल्या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी आपल्या संशोधन प्रकल्पांचे सादरीकरण केले. विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन आणि संशोधन वृत्तीला प्रोत्साहन देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
डॉ. केतन चौधरी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना शास्त्र आणि संशोधनाची नेमकी व्याख्या स्पष्ट केली. त्यांनी भारतरत्न डॉ. सी. व्ही. रामन यांच्या शोधकार्याचा आढावा घेत विद्यार्थ्यांना विज्ञानाची गोडी लावण्याचे आवाहन केले. शाश्वत विकासाची उद्दिष्टे मांडताना त्यांनी निसर्ग आणि विकास यांचा समतोल राखण्यावर विशेष भर दिला.
या कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयाच्या ‘सायन्स असोसिएशन’ मार्फत करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला प्राणीशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. एन. पी. कांबळे यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय करून दिला. याप्रसंगी महाविद्यालयातील प्राध्यापक आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.