वेळवीत काजू बी च्या वादातून मारहाण
दापोली
तालुक्यातील वेळवी येथील कलानगर आदिवासीवाडी परिसरात काजू बी काढण्याच्या वादातून कुटुंबाला शिवीगाळ व धक्काबुक्की केल्याप्रकरणी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दामोदर पवार नातेवाईकांसह गावातील सर्वे नंबर २९, हिस्सा नंबर १४/१५ या जागेवर गेले होते. यावेळी काजूच्या बिया काढण्याचे काम काही महिला कामगारांकडून सुरू होते. यावेळी बिया काढू नयेत, असे श्रीपत यांनी सांगितले. त्यानंतर दामोदर पवार हे आपल्या दोन मुलांसह व भावजयसमवेत त्या जागेवर असताना अशोक तुकाराम इवलेकर, प्रकाश तुकाराम इवलेकर, उदय तुकाराम इवलेकर, ऋतिक प्रकाश इवलेकर व नंदा प्रकाश इवलेकर यांनी रागातून पवार
कुटुंबियांना शिवीगाळ करत मारहाण केली. तसेच गाडीने उडवून ठार मारण्याची धमकी दिल्याचेही नमूद करण्यात आले आहे. या घटनेनंतर पवार यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. संशयित पाच जणांविरोधात अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम अंतर्गत तसेच भारतीय न्याय संहिता व मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, या प्रकरणाचा पुढील तपास शैलेश सणस, उपविभागीय पोलीस अधिकारी, खेड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.