तेजस एक्स्प्रेस तब्बल ७ तास उशिरा
रत्नागिरी
कोकणात शिमगोत्सवाचा उत्साह सध्या शिगेला पोहोचला असून, गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची रेल्वे स्थानकांवर मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. ‘मुंबई-मडगाव तेजस एक्स्प्रेस’चा बोजवारा उडाल्याने प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. १ मार्च रोजी ही प्रीमियम ट्रेन तब्बल ७ तास उशिराने असल्याने धावत मुंबईतील सीएसएमटी, दादर, ठाणे आणि पनवेल यांसारख्या प्रमुख स्थानकांवर प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
सकाळी ६.३० वाजता ठाणे स्थानकात येणारी तेजस एक्स्प्रेस दुपारपर्यंत न आल्याने लहानांपासून वृद्धांपर्यंत सर्वांनाच निघालेल्या उन्हाच्या झळा सोसत प्लॅटफॉ र्मवर ताटकळत उभे राहावे लागले. विशेषतः शिमग्यासाठी उत्साहात कोकणवासियांच्या आनंदावर या विलंबामुळे विरजण पडले आहे. रेल्वे सूत्रांच्या माहितीनुसार, इंजिनमधील तांत्रिक बिघाड किंवा मार्गावरील तातडीच्या देखभाल दुरुस्तीच्या कामामुळे हा विलंब झाल्याची शवयता आहे. तेजससारख्या हाय-स्पीड ट्रेनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यास प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी थांबवणे अनिवार्य असते, मात्र यामुळे रेल्वेचे वेळापत्रक पूर्णपणे कोलमडले आहे.